जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:56 IST2025-09-25T11:53:25+5:302025-09-25T11:56:34+5:30
World Second Richest Person Larry Ellison : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आपली ९५ टक्के संपत्ती दान करणार आहेत. पण, एका अटीवर.

कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आपली मोठी संपत्ती दान केली आहे. आता याच पावलावर पाऊल ठेवत आणखी एक मोठा उद्योजक आपल्या संपत्ती दान करणार आहे.
जगातील सर्वात मोठी डेटाबेस कंपनी ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन हे सध्या जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती ३७३ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे आणि सध्या ते फक्त टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यापेक्षा किंचित मागे आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ओरेकलच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे.
परंतु, फार कमी लोकांना हे माहीत आहे की लॅरी एलिसन यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा ९५ टक्के हिस्सा दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले आहे की हे दान त्यांच्या स्वतःच्या नियम आणि अटींनुसार केले जाईल.
फॉर्च्यूनच्या एका रिपोर्टनुसार, लॅरी एलिसन यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग ओरेकलमध्ये असलेल्या त्यांच्या ४१% स्टेकमुळे आहे. याव्यतिरिक्त, त्यांची टेस्लामध्येही मोठी गुंतवणूक आहे. एलिसन त्यांच्या परोपकारी कार्यांसाठी एलिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्थित ही एक 'फॉर-प्रॉफिट' संस्था आहे.
ईआयटी संस्था आरोग्य सेवा, अन्न सुरक्षा, हवामान बदल आणि एआय संशोधन यांसारख्या जागतिक समस्यांवर काम करते. लवकरच, २०२७ मध्ये ऑक्सफर्डमध्ये ईआयटीचे एक मोठे नवीन कॅम्पस उघडले जाणार आहे.
लॅरी एलिसन यांनी यापूर्वीही मोठ्या देणग्या दिल्या आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियाला कर्करोग संशोधन केंद्र उभारण्यासाठी २०० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. तसेच, त्यांनी एलिसन मेडिकल फाऊंडेशनला १ अब्ज डॉलर्स दिले होते.
न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एलिसन त्यांच्या संपत्तीचे दान करताना नेहमीच त्यांच्या अटी-शर्तींचे पालन करतात. एलिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्येही नेतृत्व बदलांमुळे अनेक आव्हाने समोर आली आहेत. एका रिसर्च लीडने अवघ्या दोन आठवड्यात या प्रकल्पाला 'अत्यंत आव्हानात्मक' सांगत राजीनामा दिला होता. यावरून एलिसन यांचा हा प्रकल्प किती कठोर आणि महत्त्वाकांक्षी आहे, हे दिसून येते.