ना नीट शिक्षण, ना केली नोकरी; २३ व्या वर्षी झाला अब्जाधीश, विकत घेतल्या प्रसिद्ध कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:42 AM2023-09-15T09:42:40+5:302023-09-15T09:54:17+5:30

आज ही व्यक्ती जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

जगातील बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुमच्याकडे भरपूर पैसा असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हीही व्यवसाय करुन यशस्वी उद्योजक बनू शकता. अशाच एका व्यक्तीनं स्वत:वर विश्वास ठेवून आपला व्यवसाय सुरू केला. आज ही व्यक्ती जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

त्यानं हार्वर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश घेतला पण दोन वर्षांनी शिक्षण अर्धवट सोडले. अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या, पण कुठेही नोकरी केली नाही. जोपर्यंत पैशांचा प्रश्न आहे, या व्यक्तीकडे आपली वेबसाइट सुरू करण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्याच्याकडे फक्त कौशल्य, आत्मविश्वास आणि जोखीम घेण्याची क्षमता होती. या तीन गुणांमुळे त्यानं असं काही केले की बिल गेट्ससारख्या दिग्गजांनाही घाम फुटला.

आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत फेसबुकचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्गबद्दल. झुकेरबर्ग हा युनिव्हर्सिटी ड्रॉपाऊट आहे. लहानपणापासूनच कम्प्युटरची आवड होती. त्यानी केलेले काम आणि उचलेली जोखीम घेण्यास यामुळे आज जग त्याचं कौतुक करतं. मार्क झुकेरबर्गचे वडील डेंटिस्ट होते.

वयाच्या १२ व्या वर्षी झुकेरबर्गने 'झुकनेट' नावाचा कम्प्युटर प्रोग्राम तयार केला. झुकनेटच्या मदतीनं झुकेरबर्गचे वडील त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असत.

मार्क झुकेरबर्गने हार्वर्ड विद्यापीठातील हॉस्टेल रूममध्ये त्याचे मित्र ड्यूस्टिन मॉस्कोविट्झ, एडुआर्डो सेव्हरिन आणि ख्रिस ह्यूजेस यांच्यासोबत फेसबुकची सुरूवात केली. सुरुवातीला त्याचे नाव The Facebook.com असे होते. हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ते तयार केलं होतं.

वेबसाइट तयार करण्यासाठी सर्व्हर खरेदी करण्यासाठी झुकेरबर्गकडे पैसे नव्हते. म्हणूनच त्याने आपल्यासोबत एडुआर्डो सेव्हरिनचा समावेश केला. सेव्हरिनने स्वतः वेबसाइटसाठी सुरुवातीला १५ हजार डॉलर्सची गुंतवणूक केली होती. वेबसाइट तयार केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी झुकेरबर्गनं हार्वर्डमधील शिक्षण सोडलं आणि फेसबुकसाठी पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.

मार्क झुकेरबर्गनं २००४ मध्ये अधिकृतपणे हे सर्वांसाठी लॉन्च केलं. काही काळानंतर, त्याचा एडुआर्डो सेव्हरिनशी वाद झाला आणि प्रकरण न्यायालयात गेलं. सावेरिनला फेसबुकमधून बाहेर काढण्यासाठी झुकेरबर्गला खूप पैसे मोजावे लागले. फेसबुक जगात खूप वेगानं लोकप्रिय झाले आणि अवघ्या चार वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये मार्क झुकरबर्ग अब्जाधीश झाला.

फेसबुक लाँच झाल्यानंतर झुकेरबर्गनं मागे वळून पाहिलं नाही. झुकरबर्गनं २०१२ मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं. व्हॉट्सअॅप खरेदी केल्यानंतर काही आठवड्यांनंतर फेसबुकनं व्हर्च्युअल रिअॅलिटी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपनी ऑक्युलस व्हीआर खरेदी केली. यानंतर त्यानं इंस्टाग्राम देखील विकत घेतलं. आज यूट्यूब आणि गुगलनंतर फेसबुकला इंटरनेटवर सर्वाधिक ट्रॅफिक मिळतो.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मार्क झुकेरबर्गची एकूण संपत्ती सध्या ११० अब्ज डॉलर्स आहे. तो जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. झुकेरबर्गने फोर्ब्सच्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही स्थान मिळवलं आहे.