१ एप्रिलपासून ATM चे गणित बिघडणार! 'UPI' कॅशवर मोजावे लागणार पैसे; बॅलन्स चेक करण्यासाठीही शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:41 IST2026-03-23T14:43:27+5:302026-03-23T15:41:22+5:30

New ATM Rules : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे १ एप्रिल २०२६ पासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँकेसह अनेक प्रमुख बँकांनी त्यांच्या एटीएम व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल जाहीर केले आहेत. विनामूल्य व्यवहारांची मर्यादा, रोख रक्कम काढण्याची सीमा आणि चार्जेसबाबतचे हे नवे नियम जाणून घेणे प्रत्येक खातेदारासाठी आवश्यक आहे.

एटीएम व्यवहारांशी संबंधित हे सर्व नवीन बदल १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. त्यामुळे ग्राहकांनी आतापासूनच आपल्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

एचडीएफसी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आता 'यूपीआय' क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून काढलेली रोकडदेखील तुमच्या मासिक 'फ्री ट्रान्झॅक्शन' मर्यादेत मोजली जाईल. यापूर्वी हे व्यवहार वेगळे मानले जात होते.

एचडीएफसी आणि बंधन बँकेत मासिक मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आता २३ रुपये अधिक कर मोजावा लागेल.

पंजाब नॅशनल बँकेने डेबिट कार्डनुसार दररोज रोख रक्कम काढण्याची मर्यादा बदलली आहे. आता ग्राहक दिवसाला ५०,००० ते ७५,००० रुपयांपर्यंतच रोकड काढू शकतील. काही कार्ड्सवर ही मर्यादा पूर्वी १ लाख रुपये होती.

बंधन बँकेच्या खातेदारांना इतर बँकांच्या एटीएमवर मेट्रो शहरांमध्ये केवळ ३ मोफत व्यवहार मिळतील, तर बिगर-मेट्रो शहरांमध्ये ५ व्यवहार मोफत असतील. स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर ५ व्यवहारांची मर्यादा कायम आहे.

जर तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील आणि त्यामुळे एटीएम व्यवहार अयशस्वी झाला, तर बंधन बँक २५ रुपये दंड आकारणार आहे. तसेच बॅलन्स चेक करण्यासारख्या 'नॉन-फायनान्शिअल' व्यवहारांसाठी १० रुपये शुल्क लागेल.

एकीकडे चार्जेस वाढत असताना, जिओ पेमेंट्स बँकेने दिलासा दिला आहे. आता ग्राहक डेबिट कार्डशिवाय केवळ QR कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढू शकतील.

बँकांचे हे नवीन नियम प्रामुख्याने ग्राहकांना प्रत्यक्ष रोकड वापरण्याऐवजी डिजिटल व्यवहारांकडे वळवण्यासाठी आणि एटीएमवरील ताण कमी करण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.