SIP vs RD: कशात पैसे गुंतवल्यास तुम्हाला जास्त मिळेल रिटर्न? जाणून घ्या फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:38 AM2024-03-08T09:38:37+5:302024-03-08T09:46:36+5:30

महागाई जशी वाढतेय तशी गुंतवणूकही महत्त्वाची ठरतेय. भविष्यातील वाढणाऱ्या गरजा पाहून गुंतवणूक करणं आवश्यक आहे.

महागाई जशी वाढतेय तशी गुंतवणूकही महत्त्वाची ठरतेय. भविष्यातील वाढणाऱ्या गरजा पाहून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सध्या आपल्याकडे गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आरडी किंवा फिक्स्ड डिपॉझिट हे गुंतवणूकीचे पारंपारिक प्रकार आजही अनेकांच्या पसंतीचे आहेत. परंतु आता अनेक जण गुंतवणूकीसाठी म्चुच्युअल फंडांकडेही वळताना दिसतायत. अनेक जण एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही एक गुंतवणूकीची रणनिती आहे ज्यामध्ये म्युच्युअल फंड स्कीममध्ये एका छोट्या निश्चित रकमेची नियमित गुंतवणूक समाविष्ट असते. एसआयपीमध्ये बाजारातील जोखीम समाविष्ट असते. असं असलं तरी तुलनेनं त्यात लवचिकताही असते. तुम्ही अगदी ५०० रुपये किंवा अगदी १००० रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता. जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं एसआयपी सक्षम मानली जाते.

रिकरिंग डिपॉझिट (RD) गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पारंपारिक गुंतवणूकदारांसाठी आरडी हा एक गुंतवणूकीचा लोकप्रि पर्याय आहे जो जवळजवळ शून्य जोखमीसह बचतीवर निश्चित परतावा देतो. जसं तुम्ही SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक करता, त्याचप्रमाणे तुम्ही RD मध्ये नियमित ठेवी देखील करू शकता आणि व्याज मिळवू शकता.

तुमच्या आवडीनुसार आरडीचा कार्यकाळ ६ महिने ते १० वर्षे असू शकतो. आज तुम्ही इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या बँकेकडे विनंती करून आरडी ऑनलाइन उघडू शकता. हे तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊन ऑफलाइन देखील केलं जाऊ शकतं.

रिकरिंग डिपॉझिटवरील ठराविक परतावा म्हणजे आरडीवर सामान्यपणे ७% ते ८% परतावा मिळत असतो. तर इक्विटी फंड इक्विटी ओरिएंटेड योजनांवरील एसआयपी दीर्घ कालावधीत सरासरी १२ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकतात. आरडीमधील पर्याय तुलनेने मर्यादित आहेत. म्युच्युअल फंड एसआयपीच्या बाबतीत तुम्हाला मिळणारा परतावा बाजारानुसार बदलू शकतो.

जर आपण जोखमीबद्दल बोललो तर, म्युच्युअल फंडातील एसआयपीपेक्षा आरडी उत्तम मानली जाते. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, बँक आरडीमध्ये डिफॉल्ट होण्याचा धोका खूप कमी आहे. दरम्यान, म्युच्युअल फंड एसआयपीच्या बाबतीत, व्याजदर जोखीम, डीफॉल्ट जोखीम, अस्थिरता, व्यवसायातील जोखीम, बाजारातील जोखीम इत्यादीसारख्या अनेक जोखीम असू शकतात.

आरडीचा एक निश्चित कार्यकाळ असतो, तो किमान सहा महिने ते जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत असू शकतो. म्युच्युअल फंड एसआयपीच्या बाबतीत, ३ वर्षांचा लॉक-इन असणाऱ्या ELSS प्रमाणे अन्य योजनांना लॉक-इन कालावधी नसतो. त्यात साधारणपणे एका वर्षाचा एक्झिट लोड असतो, परंतु आदर्शपणे, इक्विटी फंड एसआयपीमध्ये ७-८ वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये चांगले रिटर्न मिळू शकता.

लिक्विडीटीबद्दल बोलायचं झाल्यास, आरडी वेळेपूर्वी काढता येते, परंतु यामध्ये दंड आकारला जातो आणि त्यामुळे परतावा कमी होतो. दरम्यान, म्युच्युअल फंडाच्या बाबतीत, तुमची एसआयपी कधीही बंद करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तुम्ही निश्चित वेळेपूर्वी ते बंद केल्यास एक्झिट लोड लागू होईल.

अनेक बाबतींमध्ये एसआयपी ही आरडीपेक्षा अधिक स्कोअर करते. दीर्घकाळातील गुंतवणूकीवर त्यात अधिक रिटर्न मिळू शकतात. तसंच इक्विटी फंड एसआयपीमध्ये आरडीच्या तुलनेत पैसा अधिक मेहनतीनं बनतो. जेव्हा दीर्घकालीन गुंतवणूकीचा प्रश्न असतो तेव्हा आरडीच्या तुलनेत एसआयपी अधिक उत्तम ठरू शकते. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)