मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:02 IST2025-07-17T10:58:52+5:302025-07-17T11:02:39+5:30
Mumbai High Cost of Living : काही दिवसांपूर्वी गुगलमध्ये १.६ कोटी रुपये पॅकेज असलेल्या भारतीय तरुणीने न्यूयॉर्कमध्ये राहणे परवडत नसल्याचे सांगितले होते. आता असेच एक उदाहरण आपल्या मुंबईतही समोर आले आहे.

४० लाख रुपये वार्षिक कमाई, तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी नोकरी, मुंबईत १.५ कोटींचा आलिशान अपार्टमेंट आणि पार्किंगमध्ये चमकदार कार, हे कोणालाही यशाचं चित्र वाटू शकतं. मात्र, प्रत्यक्षात पडदा बाजूला सारल्यावर धक्कादायक वास्तव समोर येते. हा आयटी व्यावसायिक अक्षरशः एकही तणावमुक्त सुट्टी घेऊ शकत नाही.
चार्टर्ड अकाउंटंट (CA) नितीन कौशिक यांनी अलीकडेच 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर या चिंतेत टाकणाऱ्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला आहे. कौशिक यांनी एका ३२ वर्षीय आयटी व्यावसायिकाचं वास्तव आपल्या पोस्टमधून समोर आणलं आहे.
वार्षिक सीटीसी (CTC) ४० लाख रुपये. यात इनहँड सॅलरी (हातात येणारा पगार) २.२ लाख रुपये प्रति महिना. तरुणाने मुंबईतील मुलुंड भागात १.५ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला आहे. यासाठी दीड कोटी रुपयांचे गृहकर्ज काढले. याचा ईएमआय १.१२ लाख रुपये जातो.
या आकडेवारीनुसार, त्याच्या पगाराच्या ५०% पेक्षा जास्त रक्कम थेट गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये जाते. यात फ्लॅटच्या देखभालीचा खर्च, मालमत्ता कर किंवा वाढत्या व्याजदरांचा समावेश नाही. याशिवाय, इतर खर्च असे आहेत.
दुसरीकडे कारचा ईएमआय १५,००० रुपये, राहण्याचा खर्च (अन्न, बिलं, सामाजिक जीवन) ५०,००० रुपये. या सर्व खर्चानंतर, त्याच्याकडे महिन्याला बचतीसाठी फक्त ३०,००० ते ४०,००० रुपये इतका छोटासा मार्जिन उरतो. परंतु, आयुष्य कधीच नियोजनाप्रमाणे चालत नाही. एक छोटीशी आरोग्य समस्या, नोकरी बदलण्याची गरज किंवा अगदी एक परदेश दौरा - आणि हे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडू शकते.
सीए नितीन कौशिक यांच्या मते, ही एक सामान्य समस्या बनली आहे. पॅकेज भरपूर पण हातात रोख रक्कम (तरलता) कमी आहे. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले आहेत, पण दैनंदिन गरजांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत हातात रोख पैसा नाही.
जास्त कमावण्याच्या नादात लोक आपली जीवनशैलीही खूप महागडी बनवतात, ज्यामुळे खर्च वाढतो. निवृत्तीसाठी किंवा इतर मोठ्या उद्दिष्टांसाठी कोणतीही ठोस गुंतवणूक नसते. अचानक उद्भवणाऱ्या गरजांसाठी कोणताही आपत्कालीन निधी तयार नसतो.
जर तुमचे उच्च उत्पन्न तुम्हाला मनःशांती देत नसेल, तर तुमच्या आर्थिक दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही कौशिक यांनी सांगितले.