मुकेश अंबानींच्या कामी आला हुकूमी एक्का; पाणी विकणाऱ्या चिनी उद्योगपतीला 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 02:36 PM2021-02-27T14:36:24+5:302021-02-27T14:40:54+5:30

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले आहेत. चिनी उद्योगपती झोंग शानशान यांना मागे टाकत अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

फोर्ब्सच्या रियल-टाईम बिलिनियर्स यादीनुसार, मुकेश अंबानी आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत.

फोर्ब्सच्या बिलिनियर्सच्या यादीत मुकेश अंबानी जगात १० व्या क्रमांकावर आहेत. तर शानशान १३ व्या स्थानी आहेत.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८० बिलियन डॉलर इतकी आहे. काही महिन्यांपूर्वीच शानशान यांनी अंबानींना मागे टाकत आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती होण्याचा मान पटकावला.

मुकेश अंबानी यांनी शानशान यांना पुन्हा मागे टाकत अव्वल स्थान काबीज केलं आहे. आशियात पहिलं स्थान मिळवण्यासाठी अंबानी आणि शानशान यांच्यात जोरदार चढाओढ सुरू आहे.

चिनी उद्योगपती झोंग शानशान यांची फेब्रुवारीतली संपत्ती ७७ बिलियन डॉलर इतकी आहे. आठवड्याभरात शानशान यांच्या कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा आकडा कमी झाला.

बाटलीबंद पाण्याची निर्मिती करणाऱ्या नोंगफू स्प्रिंग कंपनीचे मालक शानशान यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी अंबानींना मागे टाकलं आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला.

आता आठवडाभरात शानशान यांच्या कंपनीचे शेअर्स कोसळल्यानं त्यांना २२ अब्ज डॉलरचं नुकसान झालं. त्यामुळे शानशान यांना अंबानी यांनी मागे टाकलं.

मुकेश अंबानींच्या यशात रिलायन्स जिओचा मोठा वाटा आहे. जिओनं २० बिलियन डॉलर्सहून अधिकची कमाई करून ती कर्जमुक्त झाल्याची घोषणा अंबानींनी गेल्या वर्षी केली. याचा मोठा फायदा अंबानींना झाला.

आधी ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या अंबानींना आता तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे.