'गदर-2'नंतर 'जवान'मधून सरकारची बक्कळ कमाई, एका तिकीटावर किती कर लागतो, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:29 PM2023-09-15T17:29:56+5:302023-09-15T17:35:26+5:30

Movie Ticket Tax: चित्रपटाच्या तिकीटातून केंद्र आणि राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. जाणून घ्या गणित...

Movie Ticket Tax: सनी देओलच्या 'गदर-2' नंतर आता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एका आठवड्यात 'जवान' चित्रपटाचे कलेक्शन 700 कोटींच्या आसपास पोहोचले आहे, तर 'गदर-2'ने 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एखादा चित्रपट यशस्वी झाला तर त्याच्या कलाकारांसह संपूर्ण टीमला फायदा होतो.

याशिवाय सरकारलाही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. भारतातील करप्रणालीनुसार, सिनेमातून सरकारला चांगली कमाई होते. भारतात दोन प्रकारच्या कर प्रणाली आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर ग्राहकांना अप्रत्यक्ष कर भरावा लागतो. मग तो एक रुपया किमतीचा माचिसचा डबा असो किंवा चित्रपटाचे तिकीट असो. याशिवाय आयकर विभाग प्रत्यक्ष कराच्या रूपात प्राप्तिकर वसूल करतो.

पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराझ सिनेमा, कार्निव्हल सिनेमा आणि सिनेप्लेक्समध्ये तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी खरेदी केलेल्या तिकिटांवर किती कर आकारला जातो, हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुमच्या एका तिकिटातून सरकारला किती कमाई होते? जर एखाद्या चित्रपटाने 500 कोटींचा व्यवसाय केला असेल तर त्यातील मोठा हिस्सा सरकारला जातो. सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे कर लागू आहेत.

मात्र प्रत्येक चित्रपटाच्या तिकिटावर ग्राहकाला जीएसटी भरावा लागतो. याशिवाय कन्व्हिनियन्स चार्जदेखील असतोच. जर तुम्ही चित्रपटाची तिकिटे ऑनलाइन बुक केलीत, तर फाऊंडेशनच्या नावावर प्रति तिकीट अंदाजे 1 रुपये आकारले जातात, जे तुम्ही बुक करता तेव्हा तिकीटावर नमूद केलेले असते.

जर तुम्ही जवान चित्रपटाचे तिकीट सुमारे 500 रुपयांना खरेदी केले तर त्यावर किती GST आकारला जातो. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तिकिटाची किंमत 100 रुपयांपर्यंत असेल तर त्यावर 12 टक्के जीएसटीची तरतूद आहे. मात्र चित्रपटाचे तिकीट 100 रुपयांपेक्षा जास्त असल्यास 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. अशा परिस्थितीत 500 रुपयांच्या तिकिटावर 18 टक्के जीएसटी लागू होतो.

याशिवाय, कन्व्हीनीअन्स शुल्क म्हणून प्रत्येक तिकिटावर जास्तीत जास्त 10 टक्के शुल्क आकारला जातो. तिकिटाची मूळ किंमत 300 रुपये असेल तर त्यावर 18% GST म्हणजेच 54 रुपये आणि 10% सुविधा शुल्क म्हणजेच 30 रुपये जोडले जातात. याशिवाय जवळपास सर्व तिकिटांवर 1 रुपये डोनेशन असते.

चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर 12 टक्के जीएसटी लागू होतो. म्हणजेच, जर चित्रपटाच्या तिकिटाची मूळ किंमत 70 रुपये असेल तर त्यावर 8.40 रुपये जीएसटी आकारला जाईल आणि 10 टक्के सुविधा शुल्क जोडल्यास ते 7 रुपये होईल. अशा प्रकारे चित्रपटाच्या तिकिटाची एकूण किंमत 85.40 रुपये होईल. याशिवाय 1 रुपये प्रति तिकीटही देणगी म्हणून घेतले जाते.

चित्रपटाच्या तिकिटांवर आकारला जाणारा जीएसटी दोन भागांमध्ये विभागला जातो. एक भाग केंद्र सरकारकडे जातो, ज्याला केंद्रीय GST म्हणजेच CGST म्हणतात आणि दुसरा भाग राज्य सरकारकडे जातो, ज्याला राज्य GST म्हणजेच SGST म्हणतात. त्यानुसार 500 रुपयांच्या चित्रपटाच्या तिकिटावर 90 रुपये जीएसटी आकारला जातो. CGST- 9% आणि SGST- 9% आहे, म्हणजेच चित्रपटाच्या तिकिटांवरून मिळणारा कर केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समान प्रमाणात विभागला जातो.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की राज्य सरकार करमणूक कर वसूल करतात, जो कधीकधी माफ केला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे करमणूक कर लागू आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात 45% करमणूक कर वसूल केला जातो. तर उत्तर प्रदेशात 60 टक्के करमणूक कर आहे. झारखंडमध्ये 110 टक्क्यांपर्यंत करमणूक कर वसूल केला जातो. तर दिल्लीत 20 टक्के करमणूक कराची तरतूद आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये करमणूक कर नाही. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये चित्रपटाच्या तिकिटांची किंमत वेगवेगळी असते.