मंदीचा आणखी फटका बसणार! आता २ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:51 PM2023-02-22T12:51:47+5:302023-02-22T13:05:06+5:30

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात मंदी आली असून, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात मंदी आली असून, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन, फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

अजुनही काही कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरुच ठेवली असून आता मॅनेजमेंट कन्सल्टिंग मॅकिन्से अँड कंपनीने २ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे नुकत्याच आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे.

मॅकिन्से अँड कंपनीच्या या निर्णयाचा थेट परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार्‍या सपोर्ट स्टाफवर होईल ज्यांचा ग्राहकाशी थेट संपर्क नाही.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मॅकिन्से कंपनीत एकूण ४५ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात, या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, टाळेबंदीचा नेमका आकडा अजून ठरलेला नाही.

२०२१ मध्ये कंपनीत एकूण १७ हजार लोक काम करत होते, तर पाच वर्षांपूर्वी एकूण २८ हजार कर्मचारी कंपनीत काम करत होते.

२०२१ मध्ये कंपनीने १५ अब्ज डॉलरची कमाई केली होती आणि २०२२ मध्ये कंपनीने स्वतःचा आकडा पार केला होता.

२०२३ ची सुरुवात होताच, Google आणि Swiggy व्यतिरिक्त Amazon, Microsoft, Twilio, Yahoo, Disney, Boeing, Dell, BYJU, OLX, Philips सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना आधीच नोकरीवरून काढून टाकले आहे.

'ज्या प्रकारे आम्ही आमच्या क्लायंटसाठी त्यांच्या टीमची रचना करतो, त्याच पद्धतीने आम्ही आमच्या टीमची पुनर्रचना करत आहोत', अशी प्रतिक्रिया मॅकिन्से अँड कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.