SIP की एकरकमी गुंतवणूक? Mutual Fund मध्ये गुंतवणुकीसाठी पाहा काय आहे योग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:35 PM2021-03-13T14:35:11+5:302021-03-13T14:45:13+5:30

Mutual Funds : गुंतवणूकीपूर्वी किती जोखीम पत्करू शकतो याचंदेखील आकलन करणं आवश्यक आहे.

सध्या अनेक जणांचा गुंतवणूक करण्याकडे त्यातून अधिक नफा मिळण्याकडे अधिक कल असतो. आपण सर्वच जण यासाठी अनेक पर्यांयांच्या शोधात असतो.

शेअर्स असो, आयपीओ किंवा म्युच्युअल फंड यात जोखीम असली तरी गुंतवणूकीचा पर्याय म्हणून अनेक जण याकडे वळत असतात.

इंटरनेटचा विस्तार आणि बाजाराबाबत झालेली जागरूकता यामुळे कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

अनेक जण सुरूवातीला गुंतवणूकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्सकडेच वळत असतात.

यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP आणि एकरकमी अशा दोन्ही प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता.

जर गुंतवणूकदाराला आपल्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दल कल्पना नसेल बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून निर्णय घेणंही कठीण होऊ शकतं.

आपण सुरूवातीची गुंतवणूक कोणत्या टूलपासून करावी असा प्रश्न नव्या आणि सुरूवातीच्या गुंतवणूकदारांच्या समोर कायम असतो.

अनेकांच्या मनात आपण एकरकमी गुंतवणूक करावी की एसआयपीच्या पर्यायांचा वापर करावा असाही प्रश्न असतो. परंतु हे दोन्ही पर्याय आपपल्या परीनं योग्य आहेत.

त्यामुळे गुंतवणूक करताना ध्येय लक्षात घेऊन आणि पर्यायांची निवड करून तज्ज्ञाच्या मदतीनं गुंतवणूक करण्याकडे कल असावा.

ज्यांना महिन्याला ठराविक रक्कम भरून गुंतवणूक करायची नसेल ते एकरकमीदेखील गुंतवणूक करू शकतात.

परंतु यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. जेणेकरून यावर मिळणारे रिटर्न्सही चांगले असतील.

जे धोका टाळू इच्छितात असे गुंतवणूकदार अनेकदा एकरकमी गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारतात. कारण त्यामुळे अधिक रिटर्न मिळू शकतो अशी त्यांची धारणा असते.

अनेकदा अनेक गुंतवणूकदार शेअर बाजार खाली येतो त्यावेळी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय स्वीकारतात.

परंतु एसआयपीमध्ये इन्क्रिमेंटल इन्व्हेस्टमेंट प्रोसस चालते, जी गुंतवणूकदाराच्या कॅपॅसिटीला लक्षात घेऊन चालते.

महिन्याला वेतन मिळवणारी लोकं एसआयपीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किंवा स्वत:ची जोखीम पत्करून गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारू शकतात. ही गुंतवणूक ५०० रूपयांपासूनही करता येते.

गुंतवणूकदारानं आपलं लक्ष्य ठरवूनच गुंतवणूकीची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. गुंतवणूकदार किती रक्कम गुंतवतोय, त्याचं महिन्याचं वेतन किती आणि त्याची जोखीम पत्करण्याची क्षमता किती आहे आणि बाजाराचे डायनॅमिक्स समजण्यासाठी तो किती सक्षम आहे हे लक्षता ठेवलं पाहिजे.

एक ठराविक उत्पन्न घेणाऱ्या व्यक्तीला बाजारातील चढ उतारात एसआयपी किती महत्त्वाची भूमिका निभावतात हे महत्त्वाचं असतं. गुतंवणूकदार म्हणून त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असते.

सुरूवातीच्या गुंतवणूकदारांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कारण ते कालांतरानं एसआयपी बंददेखील करू शकतात.

याव्यतिरिक्त बँक आपल्या ग्राहकांना डिजिटल केव्हायसी आणि अन्य माध्यमांतून प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करण्यास मदत करतात. मोबाईल अॅपच्या मदतीनंदेखील सुरूवातीला यात गुंतवणूक करणं शक्य आहे.

दुसरीकडे बाजारातील वाढ ही एकरकमी गुंतवमूक करणाऱ्यांसाठी रिटर्न मिळवण्यासाठी उत्तमरित्या प्रभावित करू शकते. परंतु यात जोखीमदेखील महत्त्वाची ठरते. (टिप: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांना सल्ला घेणं आवश्यक आहे.)