LIC shares in Adani Group: या वर्षी LIC चे सर्वात मोठे धाडस; दररोज खरेदी केले अडानी समूहाचे 3900 शेअर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:22 PM2023-04-11T15:22:34+5:302023-04-11T15:26:13+5:30

एलआयसीने आतापर्यंत अदानी समूहात 357,500 शेअर्स खरेदी केले आहेत.

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्गची रिपोर्ट आली आणि अदानी समूहाला आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स एकदम खाली आले. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील आपली गुंतवणूक काढून घेतली. पण, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने आपली गुंतवणूक सुरुच ठेवली आणि दररोज अदानी एंटरप्रायझेसचे सुमारे 3900 शेअर्स खरेदी केले. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूह जवळजवळ 60 टक्क्यांनी कोसळला आहे. अशा परिस्थितीत एलआयसीकडून कंपनीचे हजारो शेअर्स खरेदी करणे मोठे धाडस मानले जात आहे.

357,500 शेअर्स खरेदी केले- हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करत भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने मार्च तिमाहीत अब्जाधीश गौतम अदानी यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमधील हिस्सेदारी वाढवली आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे, या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसची संपत्ती निम्म्याहून अर्धी झाली होती, तरीदेखील एलआयसीने अदानी कंपनीचे 357,500 शेअर्स खरेदी केले.

मार्च तिमाहीत हिस्सा वाढून 4.26 टक्के झाला- अदानी एंटरप्रायझेसमधील PSU विमा कंपनीचा हिस्सा डिसेंबर तिमाहीत 4.23 टक्क्यांवरुन मार्च तिमाहीत 4.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. एलआयसीने या तिमाहीत अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसमध्येही हिस्सा वाढवला. दुसरीकडे, विमा कंपनीकडे अदानी पोर्ट्स आणि एसीसी आणि अंबुजा या समूहाच्या दोन सिमेंट कंपन्यांमध्येही हिस्सेदारी आहे.

जानेवारीअखेर 30,127 कोटींची गुंतवणूक- जानेवारी 2023 अखेरीस, अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक 30,127 कोटी रुपये होती. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाला वाचवण्यासाठी एसबीआय आणि एलआयसीला अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर एलआयसीने आपल्या बचावात म्हटले होते की, ते दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करते आणि तपासाच्या आधारावर गुंतवणूक करते. एलआयसीने असेही म्हटले होते की, अदानी समूहातील त्यांचे एकूण एक्सपोजर एकूण एयूएमच्या एक टक्काही नाही.

दरम्यान, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 2 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या छोट्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या जवळपास 3 पटीने वाढून 7.29 लाख झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा कंपनीचा हिस्सा आता 3.41 टक्के आहे, जो तिसऱ्या तिमाहीत 1.86 टक्के होता. म्युच्युअल फंडाने गेल्या डिसेंबर तिमाहीत हिस्सा 1.19 टक्क्यांवरून 0.87 टक्क्यांपर्यंत कमी करून स्वतःला सुरक्षित ठेवले आहे. MF गुंतवणूकदारांची संख्या देखील 31 वरून 27 वर आली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसला आपला एफपीओ रद्द करावा लागला. त्यानंतर, कर्ज कमी करण्यासाठी अदानी समूहाने US-आधारित GQG भागीदारांसोबत 15,000 कोटी रुपयांचा करार केला होता. अदानी एंटरप्रायझेस ही चार कंपन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवर्तकांनी त्यांचे स्टेक कमी केले आहेत. GQG ने 5,460 कोटी रुपयांना अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी केले होते. त्या काळात अमेरिकन कंपनीने 1,410.86 रुपये प्रति शेअर या दराने करार केला होता.

शेअर्समधील तेजी थांबली- या डीलनंतर अदानीच्या शेअर्सच्या घसरणीला ब्रेक लागला. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स मंगळवारी 1,800.55 रुपयांवर व्यवहार करत होते आणि 4,189.55 रुपयांच्या सर्वोच्च उच्चांकावरून 57 टक्क्यांनी घसरले होते. GQG चालवणारे NRI गुंतवणूकदार राजीव जैन यांनी अलीकडेच सांगितले की, अदानी कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक पाच वर्षांच्या कालावधीत मल्टीबॅगर परतावा देईल अशी त्यांची अपेक्षा आहे.