दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:09 IST2025-10-07T08:01:14+5:302025-10-07T08:09:53+5:30

दिवाळीचा सण आता काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. या सणासुदीच्या काळात घरातील सजावटीचं साहित्य, भेटवस्तू किंवा गॅझेट खरेद करण्यासाठी लोक गर्दी करतात. अलीकडच्या काळात बरेच जण क्रेडिट कार्डद्वारे मोठी खरेदी करतात. परंतु या मोठ्या रक्कमेच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करणं योग्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
व्याजदर आणि पेमेंटची वेळ - क्रेडिट कार्ड वापरणं तसे सोयीचे ठरते परंतु जर या पेमेंटचे बिल वेळेत भरले नाही तर त्यावर खूप जास्त प्रमाणात व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्डचं बिलिंग सायकल साधारणत: २८ ते ३१ दिवसांचे असते. या कालावधीत सर्व व्यवहारांची माहिती स्टेटमेंटमध्ये दिली जाते. जर कार्ड धारकाने उशिरा पेमेंट केले तर त्याला लेट फीसोबतच दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे किमान Minimum Amount Due ठरलेल्या तारखेपूर्वी भरणे आवश्यक असते.
रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि ऑफर्स - क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक किंवा सवलती मिळतात. काही कार्डांवर इलेक्ट्रॉनिक्स, गृहउपयोगी वस्तू किंवा लाइफस्टाइल वस्तूंवर जास्त कॅशबॅक दिला जातो. मात्र हे लाभ तुम्हाला होणाऱ्या व्याजापेक्षा अधिक आहेत का हे तपासणे महत्त्वाचे आहे. फक्त रिवॉर्ड मिळवण्यासाठी जास्त खर्च टाळा.
क्रेडिट लिमिट- तुमच्या कार्डवरील मर्यादा म्हणजेच “लिमिट” ठरवते की तुम्ही किती खर्च करू शकता. दिवाळीसारख्या प्रसंगी जास्त लिमिट आकर्षक वाटते, पण आपल्या उत्पन्नाच्या पलीकडे खर्च करू नका. जास्त खर्चामुळे कर्ज वाढू शकते आणि तुमचा क्रेडिट स्कोअर घसरू शकतो, ज्याचा भविष्यातील कर्जक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
ईएमआयचा पर्याय - काही बँका मोठ्या व्यवहारांना मासिक हप्त्यांमध्ये (EMI) रूपांतर करण्याची सुविधा देतात. यामुळे मोठा खर्च सुलभ होतो आणि तुमच्या रोख प्रवाहावर ताण येत नाही. मात्र, यामध्ये प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट चार्जेस किंवा उशिराने पेमेंट केल्यास दंड यांसारख्या अटी नीट वाचणे आवश्यक आहे.
उत्साहाने खरेदी टाळा - दिवाळी सेल आणि आकर्षक ऑफर्समुळे लोक उत्साहाने खरेदी करतात.खरेदीपूर्वी आवश्यक वस्तूंची यादी तयार करा आणि ठरलेला बजेट निश्चित ठेवा.योजनाबद्ध खरेदीसाठी कार्ड वापरणे अधिक सुरक्षित आहे. जरी ऑफर आकर्षक वाटत असल्या तरी अनावश्यक वस्तूंवर खर्च करणे टाळा
एकूणच दिवाळीच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणे फायदेशीर आणि सोयीचे ठरू शकते, पण ते सुज्ञपणे वापरणे गरजेचे आहे. तुमचा खर्च नियोजित ठेवा, व्याजदर समजून घ्या, रिवॉर्ड्सचा योग्य फायदा घ्या आणि ओव्हरस्पेंडिंग टाळा. असं केल्यास तुम्ही आर्थिक ताण न घेता आनंदी आणि समाधानकारक दिवाळी साजरी करू शकता.
क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे - अचानक वैद्यकीय खर्च, प्रवास किंवा घरातील दुरुस्ती यांसाठी तातडीने पैसे लागतात तेव्हा क्रेडिट कार्ड किंवा लोन उपयोगी ठरते. इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर किंवा वाहन यांसारख्या मोठ्या वस्तू EMI मध्ये घेता येतात म्हणजे एकदम मोठी रक्कम द्यावी लागत नाही.
वेळेवर परतफेड केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो, ज्यामुळे भविष्यात कमी व्याजदरात लोन मिळू शकते. काही क्रेडिट कार्डांवर कॅशबॅक, पॉइंट्स किंवा सवलती मिळतात, ज्यामुळे व्यवहारात बचत होते.
क्रेडिट कार्ड वापरताना काय घ्यायची काळजी - वेळेवर परतफेड न केल्यास ३०-४५ टक्के वार्षिक व्याज लागू शकते, जे खूप जास्त आहे. कार्ड वापरताना प्रत्यक्ष पैसे जात नाहीत असं वाटल्यामुळे लोक गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. एक लोन संपण्याआधी दुसरे घेतले, तर आर्थिक ताण वाढतो. वेळेवर हप्ते न भरल्यास तुमचा स्कोअर कमी होतो, आणि पुढे लोन मिळणे अवघड होते.