७० तास काम करा म्हणणाऱ्या नारायण मूर्तींची कंपनी म्हणते, "ओव्हरटाईम नको, आयुष्याचे संतुलन राखा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:08 IST2025-07-01T19:01:30+5:302025-07-01T19:08:44+5:30

एकीकडे, इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला देत आहेत, तर दुसरीकडे, त्यांचीच कंपनी अगदी त्याउलट करत आहे.

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी म्हटलं होतं की,'भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे.' आता त्यांची स्वतःची कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम आणि जीवनाचा समतोल राखण्यास सांगत आहे.

इन्फोसिस कंपनीने अंतर्गत मोहीम सुरू केली आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांनी कार्यालयात घालवलेल्या वेळेचा मागोवा घेतला जात आहे. ट्रॅकिंगची जबाबदारी एचआर विभागाकडे देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार फक्त ठरवून दिलेल्या तासांसाठीच काम करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

याशिवाय, इन्फोसिसची एचआर टीम ऑफिसमध्ये सरासरीपेक्षा जास्त तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याशी संबंधित ईमेल पाठवत आहे. प्रत्येकाला आठवड्यातून पाच दिवस आणि दररोज ९.१५ तास काम करण्याचे निर्देश दिले जात आहेत.

इन्फोसिस कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस नऊ तास आणि १५ मिनिटे काम करावे लागते. ही वेळ मर्यादा ओलांडताच सिस्टम अलर्ट मेसेज पाठवेल.

ईमेलमध्ये काम आणि जीवनातील संतुलन राखण्याची गरज सांगितली आहे. कंपनी हे केवळ वैयक्तिक कल्याणासाठीच नव्हे तर दीर्घकालीन व्यावसायिक परिणामकारकतेसाठी देखील महत्त्वाचे म्हणते.

इन्फोसिस कर्मचाऱ्यांना नियमित ब्रेक घेण्यास सांगितले जात आहे. जर कर्मचारी अस्वस्थ असतील तर काळजी करू नका आणि गरज पडल्यास कामाच्या संदर्भात इतरांची मदत घेण्यास सांगितले आहे.

कंपनीने हायब्रिड वर्क मॉडेल स्वीकारल्यानंतर ही मोहीम सुरू केली आहे. कंपनीने २० नोव्हेंबर २०२३ पासून रिटर्न टू ऑफिस धोरण स्वीकारले. ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान १० दिवस ऑफिसमधून काम करावे लागेल. इन्फोसिसची नवीन भूमिका कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेल्या टिप्पण्यांपेक्षा वेगळी आहे.