Inflation : महागाईचा परिणाम, २० वर्षांत इतकं घसरलं पैशांचं मूल्य; खरेदीची क्षमताही झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 10:09 AM2022-09-22T10:09:39+5:302022-09-22T10:34:15+5:30

सध्या भारतातील किरकोळ महागाईचा दर ७ टक्के आहे आणि तो सलग आठ महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक आहे. पाहा कोणत्या वस्तू किती महागल्या.

महागाईला अर्थशास्त्रात असा कर म्हणतात, जो दिसत नाही, पण त्याच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही. हा एक कर आहे जो प्रत्येकजण भरतो. सध्या भारतातील किरकोळ महागाईचा दर ७ टक्के आहे आणि तो सलग आठ महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक आहे.

महागाईचा सर्वात वाईट परिणाम असा होतो की त्यामुळे पैशाचे मूल्य कमी होते, म्हणजेच तुमची परचेसिंग पॉवर कमी होती. 20 वर्षांपूर्वी 1000 रुपयांना काय खरेदी करणे शक्य होते आणि आज इतक्या रुपयांत काय खरेदी करता येईल हे जाणून घेऊया.

बिझनेस टुडेने या तुलनेसाठी सीएमआयईच्या हिस्टॉरिकल डेटाची मदत घेतली. यावरून असे दिसून येते की, गेल्या 20 वर्षांत काही वस्तूंच्या किमती 400 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तृणधान्ये, कडधान्ये, पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादने आणि इतर मौल्यवान धातू यासारख्या वस्तूंच्या किमती तुलना करण्यासाठी वापरण्यात आल्या. हे पाहिल्यावर गेल्या 20 वर्षांत भारतीयांच्या परचेसिंग पॉवरवर कसा परिणाम झाला हे स्पष्टपणे दिसून येते.

गेल्या 21 वर्षांत बिगर बासमती तांदळाच्या किमतीत 423 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2000-01 मध्ये त्याची घाऊक किंमत 5.27 रुपये होती, ती आता 27.55 रुपये झाली आहे. अशाप्रकारे 2001 मध्ये 1000 रुपयांना 190 किलो बिगर बासमती तांदूळ खरेदी करणे शक्य होते, परंतु आता केवळ 36 किलो तांदूळ खरेदी करणे शक्य आहे.

तसेच बासमती तांदळाचा भाव 629 रुपये प्रतिक्विंटलवरून 6107 रुपये झाला आहे. ही 870 टक्क्यांची मोठी झेप आहे. या 21 वर्षात गव्हाचे भाव 166 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे या कालावधीत ज्वारी आणि बाजरीच्या दरात अनुक्रमे 420 आणि 242 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2000-01 मध्ये तूरीचा भाव 1800 रुपये प्रति क्विंटल होता, तो आता 5820 रुपये झाला आहे. ही 21 वर्षात 224 टक्क्यांची वाढ आहे. तसेच हरभऱ्याचा भाव 263 टक्क्यांनी वाढून 1400 रुपये प्रतिक्विंटलवरून 5090 रुपये झाला आहे.

इतर डाळींबाबत बोलायचे झाले तर या काळात उडीद, मूग आणि मसूर यांच्या दरात अनुक्रमे 264 टक्के, 253 टक्के आणि 340 टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ 2001 मध्ये 59 किलो उडीद डाळ 1000 रुपयांना विकत घेता येत होती, मात्र आता 16 किलोच 1000 रुपयांना मिळणार आहे.

2002-03 मध्ये दिल्लीत पेट्रोलची किंमत 29.5 रुपये प्रति लिटर होती, ती आता 233 टक्क्यांनी वाढून 98 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचा दर 360 टक्क्यांनी वाढून 19 रुपयांवरून 87.5 रुपये प्रति लिटर झाला आहे. म्हणजे 2003 मध्ये 52 लिटर डिझेल 1000 रुपयांना मिळत होते, पण आता फक्त 11 लिटरच मिळणार आहे.

2004-05 मध्ये मुंबईत 10 ग्रॅम सोने 6000 रुपयांना उपलब्ध होते. आता त्याची किंमत 700 टक्क्यांनी वाढून 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तसेच चांदीची किंमत 2004-05 मध्ये 10,350 रुपये प्रति किलोवरून 527 टक्क्यांनी वाढून 64,900 रुपये प्रति किलो झाली आहे.

या काळात केवळ अशाच गोष्टी घडल्या असे नाही. महागाईमुळे परचेसिंग पॉवर कमी झाली आहे, पण त्यासोबतच लोकांचे उत्पन्नही वाढले आहे, यात शंका नाही. 2000-01 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 18,667 रुपये होते. आता ती वाढून 1.50 लाख झाली आहे. याचा अर्थ गेल्या 21 वर्षात भारतातील लोकांचे सरासरी उत्पन्न 700 टक्क्यांनी वाढले आहे.