'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:51 IST2025-05-06T15:49:12+5:302025-05-06T15:51:55+5:30
Visa Free Countries : अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये व्हिसा आवश्यक आहे. पण, असे ५८ देश आहेत जिथे भारतीय नागरिक व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा ही २ महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. पासपोर्ट तुमचा देश तुम्हाला दोते. पण व्हिसा तुम्हाला ज्या देशात जायचे आहे, त्या देशाकडून दरवेळी दिला जातो.
अनेकदा व्हिसा न मिळाल्यामुळे लोकांची परदेशवारी हुकते. पण तुम्हाला माहिती आहे का की असे ५८ देश आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता नाही?
एखाद्या देशात व्हिसा-मुक्त प्रवेश मिळण्याचा संबंध थेट तुमचा पासपोर्ट किती मजबूत आहे यावर अवलंबून असतो. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, २०२५ मध्ये भारताचा पासपोर्ट रँकिंग घसरुन ८१ नंबरवर येईल. ज्यामुळे भारतीय नागरिकांना जगभरातील देशांमध्ये मर्यादित व्हिसा-मुक्त प्रवेश मिळेल. २०२४ मध्ये भारताचा क्रमांक ८० होता.
भारतीय नागरिकांना युरोपियन देश, अमेरिका किंवा युनायटेड किंग्डम सारख्या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी व्हिसा आवश्यक आहे. पण, असे ५८ देश आहेत जिथे भारतीय कोणत्याही व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. या देशांमध्ये इंडोनेशिया आणि मॉरिशस सारख्या काही सर्वात लोकप्रिय आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
याशिवाय लाओस, फिजी, मादागास्करसह अनेक देशांचाही या यादीत समावेश आहे. या यादीमध्ये केनिया आणि झिम्बाब्वे सारखे अनेक आफ्रिकन देश देखील समाविष्ट आहेत, जे वन्यजीवांसाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे भारतीयांना ओशनिया, फिजी, मायक्रोनेशिया, पलाऊ बेट, वानुआटु सारख्या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही.
भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त देशांमध्ये अंगोला, बार्बाडोस, भूतान, बोलिव्हिया, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, बुरुंडी, कंबोडिया, केप व्हर्डे बेटे, कोमोरो बेटे, कुक बेटे, गिनी-बिसाऊ, डोमिनिका, इथिओपिया, फिजी, ग्रेनाडा, गिनी-बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, इराण, जमैका यांचा समावेश आहे.
तर जॉर्डन, कझाकस्तान, केनिया, किरिबाटी, लाओस, मकाओ (चीनचे विशेष प्रशासकीय क्षेत्र), मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मार्शल बेटे, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मंगोलिया, मोंटसेराट, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, नेपाळ, नियू, पलाऊ बेटे, कतार, रवांडा अशा काही छोट्या पण प्रसिद्ध देशही या यादीत आहेत.
यामध्ये सामोआ, सेनेगल, सेशेल्स, सिएरा लिओन, सोमालिया, श्रीलंका, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, टांझानिया, थायलंड, तिमोर-लेस्टे, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुवालू, वानुआतु आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.