आता विनाकारण चेन पुलिंग महागात पडणार; ट्रेन थांबली, तर दर मिनिटाला एवढा दंड मोजावा लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:36 IST2024-12-05T17:30:52+5:302024-12-05T17:36:04+5:30

आता असे केल्यास 500 रुपयांच्या दंडाशिवाय आपल्याला डिटेन्शन चार्जेस देखील भरावे लागणार आहेत.

आता ट्रेनमधून प्रवास करताना विनाकारण ट्रेनची साखळी ओढली अथवा चेन पुलिंग महागात पडणार आहे. आता असे केल्यास 500 रुपयांच्या दंडाशिवाय आपल्याला डिटेन्शन चार्जेस देखील भरावे लागणार आहेत.

डिटेन्शन चार्ज दर मिनिटाला 8 हजार रुपये एवढा असेल. याशिवाय 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. अशा प्रकारे ट्रेन 5 मिनिटे थांबली तर चेन ओढणाऱ्याला 40 हजार रुपये डिटेन्शन चार्ज आणि 500 ​​रुपये दंड भरावा लागेल.

दर मिनिटाला वसून केले जातील 8 हजार रुपए... - रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एकदा चेन पुलिंगनंतर ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी जवळपास 5-7 मिनिटे लागतात. या काळात रेल्वेला मोठे नुकसान सोसावे लागते. यासाठी आतापर्यंत केवळ 500 रुपये एवढ्याच दंडाची तरतूद होती. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला आहे.

भोपाळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक देवाशिष त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या भोपाळ विभागात 6 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. गेल्या 3 महिन्यांत भोपाळ रेल्वे विभागात चेन पुलिंगच्या 1262 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे अॅक्टच्या कलम 141 नुसार, या प्रकरणात एकूण 2 लाख 90 हजार 775 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अशा प्रवाशांवरही होणार कारवाई - रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन पुलिंगनंतर अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरून पळू लागतात. नव्या व्यवस्थेनुसार, अशा लोकांनाही चेन पुलिंगसाठी दोषी मानले जाईल. पकडले गेल्यानंतर, त्यांच्यावरही स्वतंत्रपणे दंडत्मक कारवाई केली जाईल.

यामुळे, चेन पुलिंग दरम्यान कुठल्याही निर्दोष प्रवाशाने ट्रेनमध्ये चढण्याचा अथवा ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू नये. असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.