Independence Day : स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाल्या होत्या 'या' सात भारतीय कंपन्या; आजही जगभरात नावलौकिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:08 PM2022-08-08T16:08:59+5:302022-08-08T16:18:09+5:30

Independence Day: आम्ही तुम्हाला काही कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली होती आणि आजही या कंपन्या जगभरात नावलौकिक मिळवत आहेत.

15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली होती आणि आजही या कंपन्या जगभरात नावलौकिक मिळवत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या कंपन्यांचे पहिले नाव टाटा समूहाचे (Tata Group) आहे, जे जमशेदजी टाटा यांनी 1868 साली सुरू केले होते. टाटा समूहाचा व्यवसाय आयटी सेक्टर, मेटल सेक्टर, ऑटो सेक्टर आणि इतर अनेक क्षेत्रात आहे. टाटा समूह हे विमान वाहतूक क्षेत्रातील एक मोठे नाव आहे आणि टाटाने 27 जानेवारी रोजी एअर इंडिया (Air India) आपल्या ताब्यात घेतले होते.

ब्रिटानिया ग्रुपची (Britannia Group) स्थापना कोलकाता येथे स्वातंत्र्यापूर्वी 1892 मध्ये वाडिया कुटुंबाने (Wadia Family) केली होती. ही कंपनी फूड सेक्टरमध्ये सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. 11878 कोटी रुपयांच्या कमाईसह ब्रिटानिया ग्रुप बिस्किटांपासून ते इतर खाद्यपदार्थांच्या व्यवसायात अजूनही वरचढ आहे आणि त्याचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे.

गोदरेज ग्रुपची (Godrej Group) स्थापना अर्देशीर गोदरेज आणि फिरोजशा गोदरेज (Ardeshir Godrej, Pirojsha Burjorji Godrej) यांनी 1897 साली केली होती. गोदरेज ग्रुपचा व्यवसाय मेटल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच रिअॅलिटी क्षेत्रात आहे आणि त्यांचा जगभरात व्यवसाय आहे.

बिर्ला समूहाने (Birla Group) देखील स्वातंत्र्यापूर्वी आपला व्यवसाय सुरू केला होता. घनश्याम दास बिर्ला (GD Birla) यांचे आजोबा सेठ शिव नारायण बिर्ला यांनी 1857 मध्ये त्याची स्थापना केली होती. सध्या, समूहाचे बिर्ला अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आहेत आणि बिर्ला समूहाचा व्यवसाय 36 देशांमध्ये पसरलेला आहे. बिर्ला समूहाचा व्यवसाय फायबर, मेटल, सिमेंट, कपडे, कार्बन ब्लॅक, केमिकल, इंसुलेटर, वित्तिय सेवा आणि दूरसंचारमध्ये आहे.

भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक टीव्हीएस ग्रुप (TVS Group)आहे, त्याची स्थापना टीव्ही सुंदरम अयंगर यांनी 1911 मध्ये केली होती. कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथे आहे आणि कंपनीचा व्यवसाय दुचाकी आणि ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्टरिंगपासून ते ऑटोमोटिव्ह डीलरशिप, फायनान्स आणि इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायापर्यंत आहे.

डाबर कंपनीची सुरुवात 1884 मध्ये डॉ. एस.के. बर्मन नावाच्या वैद्य यांनी केली होती, ते त्यांच्या छोट्या क्लिनिकमध्ये लोकांना आयुर्वेदिक उपचार देत असत. नैसर्गिक उत्पादनांच्या वाढत्या मागणीमध्ये डाबरचा व्यवसाय वाढत आहे आणि आज कंपनीचा व्यवसाय आरोग्यसेवा, कौटुंबिक उत्पादने आणि आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये आहे. कंपनीची उलाढाल 1 हजार कोटींहून अधिक आहे.

रेमंड (Raymond) कंपनीची सुरुवात 1925 साली विजयपत सिंघानिया यांनी केली. 1958 मध्ये त्यांनी मुंबईत पहिले रिटेल शोरूम उघडले. आजही रेमंड समूहाचा मूळ व्यवसाय फॅब्रिक्सचा आहे आणि कंपनीचे शोरूम केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत.