बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:05 AM2024-05-22T08:05:28+5:302024-05-22T08:13:11+5:30

Pune Porsche Car Accident Update: बिल्डर विशाल अग्रवालला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोर्टाने सोडले असले तरी त्याला सज्ञान समजून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे. अशातच आरटीओ या प्रतापी मुलावर कारवाई करण्याची तयारी करत आहे.

बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने अपघात करून दोघांचा जीव घेतला आहे. दारुच्या नशेत या प्रतापी मुलाने पोर्शे कारने दोघांना उडविले होते. न्यायालयाने त्याला निबंध लिहिण्यास सांगून आणि पंधरा दिवस पोलिसांसोबत काम करण्यास सांगून जामिनावर सोडले असले तरी पुणे आणि राज्यातील नागरिकांचा रोष लक्षात घेऊन खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात लक्ष घातले आहे. अशातच आता आरटीओ या बिल्डरच्या प्रतापी मुलावर कारवाई करण्याची तयारी करत आहे.

पोर्शेची ही कार ईलेक्ट्रीक असून ती इम्पोर्टेड आहे. बंगळुरुच्या डीलरने ती मागविली होती. ती कर्नाटक आरटीओमध्ये टेम्पररी पासिंग करून बिल्डरला सोपविण्यात आली होती. या सर्व प्रोसेसमध्ये बंगळुरुच्या पोर्शे डीलरची काही चूक नसल्याचे महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.

इलेक्ट्रीक कार असल्या ने महाराष्ट्र सरकारने रोड टॅक्समध्ये सूट दिलेली आहे. यामुळे ही लाखोंची कार असली तरी आरटीओ रजिस्ट्रेशन चार्ज हा केवळ 1758 रुपय़े भरायचा होता. तो न भरल्याने मार्चपासून या कारचे रजिस्ट्रेशन पेंडिंग होते. यात १५०० रुपये हायपोथिकेशन आणि स्मार्ट कार्ड चार्ज २०० रुपये व पोस्टाचा खर्च ५८ रुपये होता.

आता हे जे टेम्पररी पासिंग होते ते सहा महिने व्हॅलिड होते. या पासिंगमध्ये वाहन इतर कुठेही चालवायचे नसते. तर आरटीओकडे नेण्याची या वाहनाला परवानगी असते. यामुळे ही मालकाची जबाबदारी होती. त्याने फी भरलीच नाही व अल्पवयीन मुलाला ती गाडी देऊन टाकली.

बिल्डर विशाल अग्रवालला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोर्टाने सोडले असले तरी त्याला सज्ञान समजून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे. अशातच आरटीओ या प्रतापी मुलावर कारवाई करण्याची तयारी करत आहे.

विशाल अग्रवालच्या या १७ वर्षीय मुलाला वयाच्या २५ व्या वर्षीपर्यंत लायसन मिळणार नाही. त्याच्यावर वाहन चालविण्यावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. तसेच ही लक्झरी कार पुढील १२ महिने कोणत्याही आरटीओमध्ये रजिस्टर करण्याची परवानगी दिली जाणार नाहीय. आता ही कारवाई हा गंभीर गुन्हा पाहता कमीच असली तरी हळूहळू मोकाट सुटलेल्या बिल्डरच्या व त्याच्या प्रतापी मुलाच्या मुसक्या आवळल्या जाऊ लागल्या असल्याचे संकेत आहेत.

या मुलाचे हळूहळू प्रताप समोर येऊ लागले आहेत. बिल्डरच्या या मुलामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. सोनाली यांनी बिल्डरच्या मुलासह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.

या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता'', असा गंभीर आरोप सोनाली तनपुरे यांनी केला आहे.