टप्प्यात कार्यक्रम झाला! तुर्कस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; भारताने तर पाचरच ठोकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:30 IST2025-05-28T09:14:14+5:302025-05-28T09:30:45+5:30

India vs Turkey : आधीच सलाईनवर असलेली तुर्कस्तानची अर्थव्यवस्था आता भीक मागण्याच्या उंबरठ्यावर आली आहे.

भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीवर भारतीयांनी पर्यटन बहिष्कार, कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आधीच सलाईनवर असलेली तुर्कस्तानची अर्थव्यवस्था आता भीक मागण्याच्या उंबरठ्यावर आली आहे.

तुर्कीवर आधीच आर्थिक संकट आहे, त्यात भारतामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता असून असे झाले तर पहिल्या तिमाहीत तुर्कीची आर्थिक वाढ ही २.३ टक्के राहण्याचा अंदाज रॉयटर्सने व्यक्त केला आहे.

भारताने तुर्कीसोबतची जहाज निर्माण डील रद्द केली आहे. विमानतळ, मेट्रो आदींना तुर्कीच्या कंपन्या सेवा पुरवत होत्या, त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटन बंद करण्यात आले आहे. यामुळे तुर्कीच्या कमाईच्या वाटा बंद झाल्या आहेत.

भारतीयांच्या ऑपरेशन तुर्की बायकॉटमुळे तुर्कीची अर्थव्यवस्था पाकिस्तानसारखीच रसातळाला जाणार आहे. यामुळे तेथील राजकीय स्थिती देखील बिघडत चालली आहे. भारताने तुर्कीला मदत केली नाही तर तुर्कीही पाकिस्तानसारखाच दिवाळखोर घोषित होणार आहे.

भारताने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तुर्कीमधून ३.७८ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या होत्या. २.३ अब्ज डॉलर्सचा जहाज बांधणी करार केला होता तो रद्द केला आहे. विमानतळांवर सेवा पुरविणाऱ्या सेलेबी एव्हिएशनसारख्या तुर्की कंपन्यांच्या जागी आता स्वदेशी किंवा इतर देशांच्या कंपन्या येऊ शकतात. याचा परिणाम तुर्कीवर येत्या काही वर्षांत दिसणार असल्याचे इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशनने म्हटले आहे.

तुर्कीसोबतचे शैक्षणिक संबंध देखील बिघडत चालले आहेत. नेहरू आणि जामिया विद्यापीठांचे तुर्की संस्थांसोबत सहकार्य आहे, ते देखील धोक्यात आले आहेत. एकंदरीत सार्वजनिक दबावामुळे राजनैतिक संबंध बिघडू लागले आहेत. फळांवर आधीच भारतात बहिष्कार टाकण्यात आला आहे.

तुर्कीची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. तुर्कीमध्ये मार्चमध्ये महागाई दर ३८.०१ टक्के होता. परंतू, प्रत्यक्षात ही महागाई त्याहून खूप अधिक असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी चुकीचे आर्थिक धोरण राबविले. यामुळे तुर्कीची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. व्याजदर वाढवले ​​नाहीत, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवले नाही आणि राजकीय मित्रांना मेगा प्रोजेक्ट दिले. यामुळे परकीय गंगाजळी आटली आहे. तिजोरीत ठणठणाट आहे.

क्रेडिट रेटिंग एजन्सींनी तुर्कीचे रेटिंग कमी केले आहे. याला कारण तेथील राजकीय अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा घटता विश्वास आहे. मूडीज, एस अँड पी आणि फिच यांनी तुर्कीला जंक स्टेटसवर नेऊन ठेवले आहे. तुर्की डिफॉल्टचा धोका वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.