IDFC First Bank : घरातलं फ्रिज देखील विकलं गेलं, पायलट बनण्याचं स्वप्नही अपूरं; नंतर अशी उभी केली ६० हजार कोटींची आयडीएफसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 08:43 IST2026-02-24T08:28:59+5:302026-02-24T08:43:21+5:30
IDFC First Bank Founder Success Story: लहानपणी छतावरून पडल्याच्या एका अपघातानं ज्या मुलाचं लढाऊ विमान उडवण्याचं स्वप्न हिरावून घेतलं, त्याच मुलानं पुढे जाऊन भारताच्या बँकिंग क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

IDFC First Bank Founder Success Story: लहानपणी छतावरून पडल्याच्या एका अपघातानं ज्या मुलाचं लढाऊ विमान उडवण्याचं स्वप्न हिरावून घेतलं, त्याच मुलानं पुढे जाऊन भारताच्या बँकिंग क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ही कथा आहे व्ही. वैद्यनाथन यांची, जे आज आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC First Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत.

आज जरी ही बँक ५९० कोटी रुपयांच्या संशयास्पद फसवणुकीमुळे चर्चेत असली, तरी तिच्या संस्थापकाचा प्रवास अत्यंत रंजक आहे. ओडिशामध्ये बालपणी वैद्यनाथन छतावरून पडले होते, ज्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना भारतीय वायुसेनेत फायटर पायलट व्हायचं होतं. परंतु त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं.

पत्रकार तमाल बंद्योपाध्याय यांच्या पुस्तकातील माहितीनुसार, त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबानं घरातील फ्रीजदेखील विकलं होतं. परंतु यानंतरही ते मेडिकल टेस्टमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मात्र, हार न मानता त्यांनी आपला मार्ग बदलला आणि येथूनच त्यांच्या बँकिंग प्रवासाला सुरुवात झाली.

१९९० मध्ये बीआयटी मेसरा येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सिटीबँकमध्ये नोकरी सुरू केली आणि तिथे ते ऑटो फायनान्स विभागाचे प्रमुख बनले. पुढे ते आयसीआयसीआय बँकेत रुजू झाले, जिथे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी ते सर्वात तरुण कार्यकारी संचालक बनले. त्यावेळी चंदा कोचर बँकेच्या सीईओ होत्या.

२०१० मध्ये त्यांनी जोखीम पत्करून तोट्यात चालणाऱ्या 'फ्युचर कॅपिटल होल्डिंग्स'मध्ये गुंतवणूक केली आणि तिचं रूपांतर 'कॅपिटल फर्स्ट'मध्ये केलं. पुढे २०१८ मध्ये याचं आयडीएफसी बँकेत विलीनीकरण होऊन 'आयडीएफसी फर्स्ट बँक' ही नवीन संस्था अस्तित्वात आली. ही बँक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) ३ वर्षांसाठी प्रति सामना ४.२ कोटी रुपये दरानं प्रायोजकत्व मिळवणारी बँक ठरली.

आयडीएफसी फर्स्ट बँक ही कोणत्याही एका व्यक्तीची खाजगी कंपनी नाही. पूर्वी आयडीएफसी लिमिटेड (IDFC Limited) याचे प्रवर्तक होते, ज्यांच्याकडे सुमारे ४०% हिस्सा होता. प्रस्तावित विलीनीकरणानंतर ही संरचना अधिक सोपी झाली असून, ही बँक आता मोठ्या प्रमाणावर भागधारकांवर आधारित संस्था बनत आहे. याचा अर्थ असा की, या बँकेवर कोणत्याही एका व्यक्तीचं किंवा कुटुंबाचं नियंत्रण नाही.

वैद्यनाथन यांनी आपल्या ड्रायव्हर, ट्रेनर आणि कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. इतकंच नाही तर, त्यांच्या जुन्या गणित शिक्षकांच्या मदतीसाठी त्यांनी लाखो रुपयांचे शेअर्स गहाण ठेवले होते. हे तेच शिक्षक होते ज्यांनी एकेकाळी वैद्यनाथन यांना मुलाखतीला जाण्यासाठी ५०० रुपये उधार दिले होते.

बँकेच्या वेबसाइटनुसार, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे ३.५ कोटी ग्राहक असून त्यांचा एकूण व्यवसाय ५,६२,०९० कोटी रुपये इतका आहे. यामध्ये २,८२,६६२ कोटी रुपयांच्या ग्राहक ठेवी आणि २,७९,४२८ कोटी रुपयांच्या कर्ज आणि आगाऊ रकमांचा समावेश आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक ही शेअर बाजारातील लिस्डेट कंपनी असून, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) माहितीनुसार या बँकेचं बाजार भांडवल ६०,१५१ कोटी रुपये आहे.

















