Gold Silver Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले; लग्नसराईच्या काळात खरेदीची उत्तम संधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 09:39 IST2026-04-03T09:32:21+5:302026-04-03T09:39:17+5:30
जर तुम्ही लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold-Silver Prices 3 April: जर तुम्ही लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे.

आज जागतिक वायदा बाजार 'कॉमेक्स'वर सोन्याचा भाव २.२९% च्या घसरणीसह ४,७०२.७० डॉलर प्रति औंसवर आला आहे. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत ३.८२% नं घसरून ७३.१७० डॉलर प्रति औंस झाली आहे.

आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमधील या घसरणीमागे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे मुख्य कारण आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत ११.९४७% ची वाढ होऊन ती ११२.०६७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या दरात ही तेजी आली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण युद्ध २ ते ३ आठवड्यांत थांबवण्याबाबत भाष्य केलं असलं तरी, त्यांनी निश्चित कालमर्यादेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. ट्रम्प यांच्या या विधानानंतर बाजारात अनिश्चितता वाढत आहे. सध्या 'सेफ हेवन' मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीपेक्षा डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलात चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार त्यांना पसंती देत आहेत.

दरम्यान, गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तर चांदी ४.४८ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह २,३२,६०० रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली.

बाजाराची सध्याची स्थिती पाहता गुंतवणूकदार सध्या सोन्या-चांदीसारख्या कमोडिटीपासून दूर राहत आहेत. मात्र, किमतीत होणारी ही घट सामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरत आहे.

लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे भारतात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढते. अनेकदा किमती कितीही असल्या तरी दागिने खरेदी करण्याला प्राधान्य असतं, त्यामुळे कमोडिटी मार्केटमधील ही घसरण अशा खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

















