Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:23 IST2025-10-22T10:01:44+5:302025-10-22T10:23:26+5:30

Gold Silver Price Drop: सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अनेक आठवड्यांच्या तेजीनंतर मंगळवारी सोनं चार वर्षांतील सर्वात मोठ्या एका दिवसाच्या घसरणीला बळी पडलं.

Gold Silver Price Drop: सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अनेक आठवड्यांच्या तेजीनंतर मंगळवारी सोनं चार वर्षांतील सर्वात मोठ्या एका दिवसाच्या घसरणीला बळी पडलं, त्यामुळे दर सुमारे ४ टक्के पर्यंत खाली आले आहेत. सोमवारी सोनं विक्रमी ४३८१ डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते, पण मंगळवारी ते ४१८७ डॉलर पर्यंत घसरलं, म्हणजे ३.८ टक्क्यांनी कमी झालं.

बुधवारीही यातील घसरण सुरू राहिली, सोनं २.९ टक्के आणखी खाली जाऊन ४००४.२६ डॉलरच्या आसपास पोहोचलं, तर मंगळवारी तर ६.३ टक्के पर्यंतची घसरण झाली होती जी दहा वर्षांहून अधिक काळातील सर्वात मोठी इंट्राडे (Intraday) घसरण होती. चांदीतही घसरण दिसून आली, मंगळवारी ती ७ टक्के घसरली आणि बुधवारी २ टक्क्यांहून अधिक खाली जाऊन ४७.६ डॉलर प्रति औंस वर आली, तर यापूर्वी ती ५४ डॉलर होती.

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, पहिलं कारण म्हणजे अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोनं-चांदी महाग होऊ लागलं. दुसरं, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धात नरमाईचे संकेत मिळत आहेत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची पुढील आठवड्यात भेट होणार आहे, व्यापार कराराच्या अपेक्षेमुळे 'सेफ हेवन' म्हणून असलेली मागणी कमी झाली आहे.

भारतातही सणांचा हंगाम संपत आला आहे, हंगामी खरेदी थांबली आहे, यामुळेही दबाव येत आहे. तिसरं कारण म्हणजे, RSI (Relative Strength Index) सारखे टेक्निकल इंडिकेटर्स 'ओव्हरबॉट झोन' मध्ये पोहोचले होते, म्हणजे किंमती खूप वेगाने वाढल्या होत्या, त्यामुळे करेक्शन आवश्यक होते. सॅक्सो बँकेचे (Saxo Bank) तज्ज्ञ ओले हॅन्सन म्हणतात की व्यापारी सावध झाले होते, बाजार खूप वर गेला होता, आता हे करेक्शन खरी ताकद दाखवेल, पण दीर्घकालीन गुंतवणूकदार अजूनही उत्सुक आहेत, त्यामुळे घसरण मर्यादित राहू शकते.

चौथे, ईटीएफ बाजारात हालचाल, जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ईटीएफ 'एसपीडीआर गोल्ड शेअर्स'मध्ये ऑप्शन व्हॉल्यूमनं विक्रम मोडला, गेल्या आठवड्यात दोन दिवसांत २० लाखांहून अधिक कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड झाले. ट्रेडर्स घसरणीवर हेजिंग करत आहेत किंवा प्रॉफिट बुक करत आहेत. चांदीमध्ये या वर्षी ८० टक्के तेजी आल्यानंतर ७ टक्के घसरण झाली आहे, लंडनमध्ये शॉर्टेज, शांघायमधून आउटफ्लो, न्यूयॉर्कमधील साठा कमी झाला आहे.

पाचवे, अमेरिकन सरकार शटडाउन मुळे CFTC चा साप्ताहिक अहवाल आला नाही, हेज फंड्सची स्थिती कळू शकली नाही, सट्टेबाजीच्या 'लाँग पोझिशन्स' वाढल्या, त्यामुळे बाजार असुरक्षित झाला. एएनझेड बँकेचे (ANZ Bank) विश्लेषक म्हणतात की पोझिशनिंग खूप जास्त झाली होती, ज्यामुळे 'सेलऑफ' ट्रिगर झाला, पण लाँग टर्म ड्रायव्हर्स अजूनही समर्थन देत आहेत. याव्यतिरिक्त, स्टॉक मार्केटमध्येही तेजी थांबली, आशियाई शेअर्स घसरले, परंतु इक्विटीमध्ये धोका (Risk) जोडण्याची संधी दिसत आहे.

टाइम्स ऑफ इंडियानुसार, मंगळवारी ऑस्ट्रेलियन शेअर्स घसरले, हाँगकाँगचे इक्विटी फ्युचर्सही खाली आले, जपानचे बेंचमार्क संमिश्र राहिले. एस अँड पी ५०० मंगळवारी जवळपास कोणताही बदल न होता बंद झाल्यामुळे अमेरिकन शेअर फ्युचर्स थोडे कमी झाले. इतिहास सांगतो की मोठ्या तेजीनंतर खरेदी विक्रीमध्ये बदलते. जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत निघाली, डॉलर इंडेक्स उच्च राहिला तर आणखी घसरण होऊ शकते. पण राजकीय किंवा आर्थिक अनिश्चितता वाढल्यास सोन्याची चमक परत येईल.