सोने खरेदीचा ट्रेंड धक्कादायक! दरवाढीचा मोठा फटका; अक्षय तृतीयेला विक्रीत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 04:34 PM2023-04-24T16:34:01+5:302023-04-24T16:44:43+5:30

अक्षय तृतीयेचा सोने खरेदीचा ट्रेंड काय सांगतो? 2023 मध्ये सोन्याचा दर कुठे असेल... चांदीच चांदी...

अक्षय तृतीयेला सोन्या विक्रीत अंदाजापेक्षाही खूपच जास्त घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सोन्याच्या दुकानात गर्दी दिसली तरी दरवर्षीच्या विक्रीत जी घट झाली आहे, यामुळे सोन्याच्या दरांमध्ये झालेली मोठी वाढ कारणीभूत असल्याचे दिसत आहे.

या दिवशी सोन्याच्या दागिन्यांऐवजी दुसरे आयटम्स खरेदीकडे ग्राहकांचा कल राहिला होता. या दिवशी सोन्याच्या विक्रीत २० टक्क्यांची घट येईल असा अंदाज होता. परंतू प्रत्यक्षात ५० टक्क्यांनी सोन्याची विक्री कमी झाल्याचे पहायला मिळाले आहे. समोर आलेल्या ट्रेंडनुसार यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्के कमी व्यवसाय झाला आहे. बहुतांश ग्राहकांनी सोन्याची नाणी, नाणी, छोट्या वस्तू खरेदी केल्या आहेत.

याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे वस्तू शुद्ध सोन्याच्या श्रेणीत येते आणि त्याची विक्री करायला गेल्यास बाजारभावानुसार किंमत मिळते हे आहे. तर दागिने खरेदी केल्यास मेकिंग चार्ज मोठ्या प्रमाणावर आकारला जातो. या दागिन्यांची विक्री करतानाही शुद्ध सोन्यापेक्षा कमी शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणानुसार किंमत दिली जाते.

यंदा 10 ग्रॅम सोन्याचा दर 60 हजार रुपयांवर गेला आहे. हा दर गेल्या वर्षी सुमारे 50 हजार रुपये होता. यामुळे दागिने 20 टक्के जास्त किंमत मोजून खरेदी करणे हे लोकांना परवडणारे नव्हते. सोन्याचे दर भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लोक यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.

यंदा सोनारांनी मेकिंग चार्जवर २०-३० टक्के सूट दिली होती. परंतू, तरी देखील ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदीकडे पाठ फिरविली आहे. साध्या साध्या सोनारांनीच नाही तर तनिष्क, पीपी ज्वेलर्स, जो अलुकास यांच्यासारख्या ब्रँडनी सोन्याच्या खरेदीवर सूट दिली होती.

जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जात आहे. जगातील बँकांनी सोन्यात पैसे गुंतविण्यास सुरुवात केल्यानेही किमती वाढत आहेत. अशा स्थितीत 2023 मध्ये सोन्याचा भाव 66 हजार ते 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे. परंतू जर परिस्थिती सामान्य झाली आणि महागाईचा दर खाली आला तर सोन्याचे भावदेखील गडगडण्याची शक्यता आहे.

RBI ने 5 वर्षात डॉलरचा साठा कमी केला आहे. हाच पैसा सोन्यात गुंतवला असून साठा 5.06% वरून 7.86% पर्यंत वाढवला आहे. जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 8 टक्के सोन्याचा साठा भारतात आहे. हा साठा १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

भारतीयांकडे जवळपास 25 हजार ते 27 हजार टन सोने, दागिने आहेत. तर देशातील मंदिरांजवळ 3 हजार ते 4 हजार टन सोने असण्याची शक्यता आहे.