फक्त एवढ्या दिवसांत ₹10000 वरून ₹60000 वर पोहोचलं सोनं; आता खरेदी करावं, विकावं की होल्ड करावं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 07:09 PM2023-03-20T19:09:24+5:302023-03-20T19:20:50+5:30

गेल्या केवळ अडीच वर्षांत सोन्याचा दर 50,000 वरून 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

एकीकडे बँकिंग क्रायसिस सुरू असतानाच दुसरीकडे सोन्याचा भाव सोमवारी गगनाला भिडला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याने 60000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे.

सोन्याचा दर 30000 रुपयांवरून 40000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचण्यासाठी तब्बल 8 वर्षे लागली. मात्र गेल्या केवळ अडीच वर्षांत सोन्याचा दर 50,000 वरून 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. केवळ 17 वर्षांच्या काळातच सोन्याचा दर तब्बल 6 पट वाढला आहे.

केडिया अॅडव्हायजरीचे अध्यक्ष अजय केडिया यांनी सांगितले की, 5 मे 2006 रोजी सोने 10000 रुपये प्रति 10 ग्रॅम या लँडमार्कवर पोहोचले होते. यानंतर त्याला 20000 रुपयांवर पोहोचण्यासाठी जवळपास 4 वर्ष लागली. 6 नोव्हेंबर 2010 रोजी सोने 20000 वर पोहोचले आणि याच्या विस महिन्यानतंर 1 जून 2012 रोजी सोने 30000 रुपयांवर पोहोचले होते.

केवळ 6 महिन्यांतच 40 वरून 50 हजार रुपयांवर पोहोचले सोने - सोने 30000 रुपयांवरून 40000 पर्यंत पोहोचण्यासाठी दीर्घ काळ लागला. तीन जानेवारी 2020 रोजी सोने 40000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. यानंतर सोने 40000 हजारवरून 50000 पर्यंत पोहोचायला अगदी 6 महिन्यांपेक्षाही कमी काळ लागला.

यानंतर केवळ 3 वर्षांच्या आतच सोने आता नव्या ऑल टाईम हायवर पोहोचले आहे. सोन्याने एमसीएक्सवर पहिल्यांदाच 60000 पार पोहोचून इतिहास रचला आहे.

केडिया यांच्या मते, गेल्या तीन महिन्यांत सोन्याने ज्या ठिकाणी 14 टक्क्यांचा परतावा दिला आहे, त्या ठिकाणी निफ्टी जवळपास 7 टक्के तर सेंसेक्स 5.73 टक्के घसरला आहे.

सोनं खरेदी करावं, विकावं की होल्ड करावं? - यासंदर्भात बोलताना अल्फा कॅपिटलचे सह-संस्थापक डॉ मुकेश जिंदल म्हणाले, "नजीकच्या काळात सोने चांगले प्रदर्शन करेल अशी आशा आहे. कारण अमेरिकन डॉलरचा सोन्यावर प्रभाव पडत असतो. डॉलर इंडेक्स घसरल्यास सोन्याचे दर वधारतात. यूएस डॉलर इंडेक्स 22 ऑक्टोबरपासून घसरत आहे आणि सोन्याचे दरही 22 ऑक्टोबरपासून वाढताना दिसत आहेत. हे सुरूच राहण्याची शक्यता आहे."

जिंदल म्हणाले, सिलिकॉन व्हॅली बँक संकटानंतर 2023 मध्ये दर कमी करेल. यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत सोने चांगले प्रदर्शन करेल.