एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:20 IST2025-05-12T14:09:53+5:302025-05-12T14:20:18+5:30
Gold Silver Price 12 May: शस्त्रसंधीनंतर आज सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price 12 May: शस्त्रसंधीनंतर आज सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज १२ मे रोजी २४ कॅरेट सोने एका झटक्यात प्रति १० ग्रॅम २०२३ रुपयांनी स्वस्त झालं आणि आज ते ९४३९३ रुपयांवर पोहोचलं आहे. तर, चांदी १९१ रुपयांनी महाग झाली आणि ९५९१७ रुपये प्रति किलोवर उघडली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
यंदा सोनं सुमारे १८,६५३ रुपयांनी तर चांदी ९९०० रुपयांनी महागली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ४७०७ रुपयांनी स्वस्त झालंय.
आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव २०२५ रुपयांनी घसरून ९४,०१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १८५३ रुपयांनी घसरून ८६,४६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव १५१७ रुपयांनी घसरून ७०,७९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ११८३ रुपयांनी कमी होऊन ५५,२२० रुपयांवर आला.
अमेरिका-चीन व्यापार कराराबाबत वाढलेल्या अपेक्षा आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीमुळे गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला. यामुळे आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव ९५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. सकाळी एमसीएक्स सोन्याचा भाव २,२५३ रुपये म्हणजेच २.३३ टक्क्यांनी घसरून ९४,२६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. एमसीएक्सवर चांदी ५७८ रुपये म्हणजेच ०.६० टक्क्यांनी घसरून ९६,१५१ रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होती.
अमेरिका-चीन व्यापार चर्चेतील आशावादी संकेतांमुळे बाजाराची भीती कमी झाली. स्पॉट गोल्डचा भाव १.४ टक्क्यांनी घसरून ३,२७७.६८ डॉलर प्रति औंस झाला, तर अमेरिकन सोन्याचा वायदा १.९ टक्क्यांनी घसरून ३,२८१.४० डॉलरवर आला.