मुंबई, पुण्यासारखी शहरे असूनही...! सोने खरेदीत महाराष्ट्र कितव्या नंबरवर? खरेदीचा पॅटर्न बदलला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:53 IST2026-01-06T11:47:06+5:302026-01-06T11:53:34+5:30

Gold Price History 2005-2025: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होऊनही भारतात ८००-१००० टन मागणी कायम. ज्वेलरीऐवजी आता गुंतवणुकीकडे कल वाढला. तमिळनाडू आणि महाराष्ट्र खरेदीत आघाडीवर.

सोन्याच्या किमती गगनाला भिडत असतानाही भारतीयांचे सोन्याप्रती असलेले आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही. उलट, वाढत्या महागाईच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक दृढ झाला आहे. ताज्या अहवालानुसार, सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर असूनही बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कायम आहे, मात्र त्यांच्या खरेदीच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे.

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. असे असूनही लग्नसोहळे आणि सण-उत्सवांच्या काळात दागिन्यांच्या मागणीत घट झालेली नाही. ग्राहक आता मोठ्या दागिन्यांऐवजी 'लाइटवेट' (हलक्या वजनाचे) आणि आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांना अधिक पसंती देत आहेत. यामुळे खिशाला फारशी कात्री न लावता परंपरेचे जतन करणे ग्राहकांना शक्य होत आहे.

केवळ भौतिक सोनेच नाही, तर आता भारतीय गुंतवणूकदार 'डिजिटल गोल्ड' आणि 'गोल्ड ईटीएफ'कडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. सुरक्षितता आणि सुलभता यामुळे तरुण पिढी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी या डिजिटल माध्यमांचा वापर करत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करणे फायदेशीर ठरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एवढ्या मोठ्या दरवाढीनंतरही भारतात दरवर्षी सरासरी ८०० ते १,००० टन सोन्याची मागणी कायम आहे. दोन दशकांपूर्वी एकूण सोन्याच्या खरेदीत दागिन्यांचा वाटा ७५-८० टक्के असायचा. मात्र, आता हा ट्रेंड बदलत आहे. पूर्वीच्या ७५-८० टक्क्यांवरून आता ६०-६५ टक्क्यांवर आला आहे.

गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी आणि बिस्किटे घेण्याकडे लोकांचा कल वाढला असून, हा हिस्सा आता २५-३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

ग्रामीण भागात आजही २२ कॅरेट सोने सांस्कृतिक संपत्ती म्हणून लोकप्रिय आहे. मात्र, शहरी भागात आणि तरुण पिढीमध्ये १८ कॅरेटच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. प्रामुख्याने ब्रँडेड ज्वेलरी आणि हिऱ्यांचे दागिने यामध्ये १८ कॅरेट सोन्याचा वापर वाढला असून, सोन्याकडे 'वापरण्याऐवजी' एक 'गुंतवणुकीचे साधन' म्हणून पाहिले जात आहे.

भारतातील एकूण सोन्याच्या बाजारपेठेत दक्षिण आणि पश्चिम भारताचा दबदबा आहे. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात सोने खरेदीचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडू हे राज्य देशातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ मानले जाते. येथील विवाह सोहळे आणि धार्मिक परंपरांमध्ये सोन्याची विक्रमी खरेदी केली जाते.

यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या उद्देशाने आणि सण-उत्सवांच्या निमित्ताने सोन्याला मोठी मागणी असते. तिसऱ्या क्रमांकावर केरळ असून कर्नाटक आणि गुजरातचा यानंतर क्रमांक लागत आहे.

टॅग्स :सोनंGold