Gautam Adani Net Worth: गौतम अदानींचे जोरदार पुनरागमन; दिग्गजांना मागे टाकत 24 तासात केली सर्वाधिक कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:19 PM2023-05-23T20:19:21+5:302023-05-23T20:24:01+5:30

Gautam Adani Net Worth: गौतम अदानींनी बर्नार्ड अर्नॉट आणि इलॉन मस्कसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

हिंडनबर्क रिपोर्टमुळे गेल्या काही महिन्यांपासून पिछाडीवर असलेल्या गौतम अदानी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत कमाईच्या बाबतीत गौतम अदानी पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत आहे. त्यामुळे अदानीच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात गौतम अदानींची नेटवर्थ $9 बिलियन पेक्षा जास्त वाढली आहे.

फोर्बच्या रिअल टाईम बिलियनर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांनी गेल्या 24 तासांत 9.3 अब्ज डॉलर्स, म्हणझेच सुमारे 77,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मंगळवार, 23 मे रोजी सलग तिसऱ्या दिवशी अदानींच्या शेअर्सने शेअर बाजारात तुफानी वाढ नोंदवली. अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनसह पाच समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये अपर सर्किट पाहायला मिळत आहे. तर अदानी एंटरप्रायझेस 14 टक्के आणि अदानी विल्मर 10 टक्क्यांनी वधारले आहे. या तेजीमुळे समूहाचे बाजार भांडवल 10 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

फोर्ब्सनुसार, एका दिवसांच्या कमाईच्या बाबतीत अदानींनी जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बर्नार्ड अर्नॉल्ट आणि दुसरे सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांच्यासह अनेक दिग्गज अब्जाधीशांना मागे सोडले आहे. 24 तासांत गौतम अदानी यांना 9.3 अब्ज डॉलरचा नफा झाला आहे. तर, इलॉन मस्कची संपत्ती $5.7 बिलियन आणि बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती $5.8 बिलियनने वाढली. याशिवाय लॅरी पेज ($ 1.9 अब्ज) आणि सर्गे ब्रिन ($ 1.8 बिलियन) देखील त्यांच्या मागे होते.

संपत्तीतील या वाढीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $55 अब्ज झाली आहे. एवढ्या संपत्तीसह ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 24 व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळत असली तरीदेखील या वर्षात सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत ते पहिल्या स्थानावर आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यापासून अदानींच्या संपत्तीत $60.7 अब्जची घट झाली आहे.

गौतम अदानी यांच्यासह रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याबद्दल सांगायचे तर ते $87.3 अब्ज संपत्तीसह यादीत 14 व्या स्थानावर आहेत. गेल्या 24 तासांत त्यांची एकूण संपत्ती $389 मिलियन (सुमारे 3222 कोटी रुपये) वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबानी आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. कधी अंबानी तर कधी झुकेरबर्ग मागे जाताना दिसतात. सध्या मार्क झुकेरबर्ग $88.3 अब्ज संपत्तीसह जगातील 13 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

जगातील टॉप-10 अब्जाधीशांबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट आहेत. त्यांची एकूण संपत्ती 226.4 अब्ज डॉलर आहे. या यादीत इलॉन मस्क $190.4 अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर, Amazon चे जेफ बेझोस $137.8 बिलियनसह तिसऱ्या, लॅरी एलिसन $127 बिलियनसह चौथ्या आणि $114.9 अब्ज डॉलर्ससह दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट पाचव्या स्थानावर आहेत.

इतर श्रीमंतांमध्ये, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे 114.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. लॅरी पेज 106.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या स्थानावर आहे, तर सर्गे ब्रिन 100.9 अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह बाल्मर $ 99.1 अब्ज संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 9 व्या स्थानावर आहे, तर कार्लोस स्लिम हेलू $ 96.2 अब्ज संपत्तीसह जगातील 10 व्या क्रमांकावर आहे.