गुंतवणूकदार कंगाल! ₹660 वरून घसरून ₹2 वर आला हा शेअर, 1 लाखाचे झाले ₹300

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:09 PM2023-04-04T22:09:11+5:302023-04-04T22:16:49+5:30

या रिटेल कंपनीवर प्रचंड कर्जाचा बोजा आहे आणि तिचा स्टॉक आतापर्यंतच्या उच्चांकावरून जवळपास 100 टक्क्यांनी घसरला आहे.

सध्या फ्युचर ग्रुपच्या अनेक कंपन्या मोठ्या कर्जामुळे दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहेत. याचा परिणाम समूहातील इतर कंपन्यांच्या शेअर्सवरही होताना दिसत आहे. असाच एक शेअर आहे फ्युचर रिटेलचा (Future retail share). या रिटेल कंपनीवर प्रचंड कर्जाचा बोजा आहे आणि तिचा स्टॉक आतापर्यंतच्या उच्चांकावरून जवळपास 100 टक्क्यांनी घसरला आहे.

हा शेअर 27 नोव्हेंबर 2017 रोजी 660 रुपयांवर होता. स्टॉकचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आता या शेअरची किंमत 2 रुपयांपेक्षाही कमी झाली आहे. अर्थात या काळात एक लाखाची गुंतवणूक सुमारे 300 रुपयांवर आली असेल.

सोमवारी शेअरमध्ये दिसली तुफान तेजी - गेल्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात सोमवारी, फ्यूचर रिटेलच्या शेअरमध्ये तुफानी तेजी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, हा शेअर 4.67% वाढून 2.24 रुपयांवर बंद झाला होता. तसेच, ट्रेडिंगदरम्यान हा शेअर 2.10 रुपयांपर्यंत खालीही गेला होता.

2.10 रुपये हा या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक होता. तसेच, एप्रिल 2022 मध्ये हा शेअर 34.30 रुपयांवर होता. महत्वाचे म्हणजे मंगळवारी महावीर जयंती होती. त्यामुळे शेअर बाजार बंद होता.

कर्जात बुडालेल्या फ्यूचर रिटेलचे फाउंडर किशोर बियानी यांनी नुकताच आपला रिजानामा परत घेतला आहे. बियानी यांनी 23 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचा आणि संचालक पदाचा राजीनामा पाठवला होता. यानंतर जवळपास दीड महिन्यांनंतर त्यांनी आपला राजीनामा परत घेतला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)