१५ दिवसांत १ हजार कोटींची कमाई, रेखा झुनझुनवालांनी दिग्गजांना ‘या’ लिस्टमध्ये टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:50 AM2023-03-24T11:50:33+5:302023-03-24T11:59:37+5:30

पाहा किती आहे त्यांची संपत्ती.

अमेरिका, युरोप यांसारख्या मोठ्या देशांच्या बाजारामध्ये मोठा चढ उतार सुरु आहे. अब्जाधीशांची संपत्ती कमी होत आहे, पण नवीन अब्जाधीश निर्माण करण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये नवीन अब्जाधीशांच्या निर्मितीच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत भारतातील १६ नवीन उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना शेअर बाजाराचे बिग बुल म्हटलं जायचं त्या राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या नव्या अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

दिवंगत उद्योगपती आणि स्टॉक मार्केट टायकून राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नीने अल्पावधीतच हे स्थान मिळवले आहे. राकेश झुनझुनवाला यांचा केवळ वारसाच त्यांनी जपला नाही, तर त्या तो झपाट्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रेखा झुनझुनवाला या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म १२ सप्टेंबर १९६३ रोजी मुंबईत झाला. त्याचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईतच झालं. १९८७ मध्ये त्यांचा राकेश झुझुनवाला यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुलं आहेत.

बिग बुल या नावानं प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा यांना शेअर बाजार आणि गुंतवणुकीची चांगली जाण आहे. आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी कंपनीचा विस्तार केला.

रेखा आपल्या पतीची कंपनी रेअर एंटरप्रायझेस यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांच्या कंपनीकडे टाटा समूहाची कंपनी टायटनचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे टायटनचे ५ टक्के शेअर्स आहेत.

रेखा झुनझुनवाला या देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. जर आपण कमाईबद्दल बोललो तर त्या दरमहा ६५० कोटी रुपये कमावतात. जर आपण एकूण संपत्ती पाहिली तर त्यांची एकूण मालमत्ता ४७,६५० कोटी रुपये आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये रेखा झुनझुनवाला त्यांच्या कमाईमुळे चर्चेत आल्या. अवघ्या २ आठवड्यात त्यांनी १ हजार कोटी कमावले होते. टायटन कंपनीच्या शेअर्सच्या माध्यमातून त्यांनी १५ दिवसांत १ हजार कोटी रुपयांचा नफा कमावला. स्टॉक मार्केटबद्दलची त्यांची समज राकेश झुनझुनवाला यांच्यासारखी आहे.