दूरसंचार कंपन्यांना चाचणीसाठी 5G स्पेक्ट्रम्सचं वाटप; 'या' शहरांमध्ये सुरू होणार ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 08:55 PM2021-05-29T20:55:36+5:302021-05-29T20:59:31+5:30

5G Trials In India : दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार हे ट्रायल देशातील सर्व भागांमध्ये 5G सेवा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणार आहे.

दूरसंचार विभागानं देशात 5G सेवांच्या चाचणीसाठी दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप केलं आहे. सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

या क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात 5G सेवांची चाचणी मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, राजस्थान आणि हैदराबादसह अन्य ठिकाणी होणार आहेत.

एका दूरसंचार कंपनीच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3.6 गेगाहर्ट्झ बँड्स आणि 24.25-28.5 गेगाहर्ट्झ बँड्सचे स्पेक्ट्रम चाचणीसाठी देण्यात आले आहेत.

दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार 5G तंत्रज्ञानाच्यामुळे डाऊनलोड स्पीडमध्ये जवळपास 10 पटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय स्पेक्ट्रम एफिशिअन्सी ही 3 पटींनी उत्तम होण्याची शक्यताही आहे.

4 मे रोजी दूरसंचार विभागानं रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलद्वारे चिनी कंपन्यांच्या तंत्रज्ञानाची मदत न घेता 5G चाचणी करण्याच्या अर्जाला मंजुरी दिली होती.

विभागानं एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी डॉटच्या मदतीनं मिळून या चाचणीला मंजुरी दिली. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही चाचणी करणार आहे.

चाचणीदरम्यान भारतीय सेटिंग्समध्ये 5G च्या अॅप्लिकेशनची चाचणी घेण्यात येणार आहे. यादरम्यान टेली-मेडिसिन, टेली एज्युकेशन आणि ड्रोन आधारित शेतीवर लक्ष याची चाचणी केली जाईल.

कंपन्या आपल्या नेटवर्कवर अनेक 5G डिव्हाईसेसची चाचणी करणार आहे. ही चाचणी ६ महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल, ज्यामध्ये 5 महिन्यांचा कालावधी इक्विमेंट्स जमवण्यासाठी आणि त्यांची जोडणी करण्यासाठी आहे.

सर्व लोकांना या सेवेचा फायदा मिळण्यासाठी कंपन्यांना आपल्या 5G सेवेची चाचणी शहरांसोबत गावांमध्येही करावी लागणार असल्याचं दूरसंचार विभागाद्वारे देण्यात आलेल्या मंजुरीच्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

सध्या कोणत्याही कंपन्यांना पंजाब, हरयाणा या ठिकाणी स्पेक्ट्रम देण्यात आले नसल्याची माहिती दूरसंचार विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी देशातील मोठ्या प्रमाणात ग्राहक 5G सेवांसाठी अधिक खर्च करण्यासही तयार असल्याची माहिती एका अहवालाद्वारे समोर आली होती.

ज्यावेळी देशात 5G सेवा लाँच होईल तेव्हा पहिल्याच वर्षी किमान 4 कोटी ग्राहक त्याचा वापर करतील असा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला होता.

Ericsson द्वारे करण्यात आलेल्या पाहणीतून हा अंदाज व्यक्त करण्यात आला. यामध्ये 5G आल्यानंतर सध्या किती स्मार्टफोन युझर्स आहेत आणि त्यांच्यावर काय परिणाम होतील याचा अभ्यास करण्यात आला.

याशिवाय युझर्सना या तंत्रज्ञानाकडून काय अपेक्षा आहेत याची माहिती या सर्वेक्षणातून घेण्यात आली. एरिक्सन इंडिया आणि नेटवर्क सोल्युशननं साऊथ ईस्ट इंडिया, ओशनिया अँड इंडियाचे प्रमुख नितीन बन्सल यांनी या अभ्यासातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आल्याचं म्हटलं होतं.

भारतीय ग्राहक 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक रक्कमही देण्यास तयार आहेत,तर 5G कनेक्टिव्हीटीसाठी ते 10 टक्के प्रिमिअमही देण्यास तयार असल्याचं अहवालातून समोर आलं आहे.