दिवाळीला गुंतवणुकीची मोठी संधी; ‘या’ ४ कंपन्यांचे IPO झाले खुले, कोट्यवधींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 05:43 PM2021-11-01T17:43:43+5:302021-11-01T17:48:30+5:30

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चार मोठ्या कंपन्यांचे IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले झाले आहेत.

शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड काहीशी मंदावलेली पाहायला मिळत असली तरी दिवाळीच्या निमित्ताने गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. चालु आर्थिक वर्षात अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO सादर झाले आहेत.

यातच आता दिवाळीच्या निमित्ताने गुंतवणुकदारांना कमाई करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चार मोठ्या कंपन्यांचे IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होत आहेत.

यामध्ये ऑनलाइन इन्शुरन्स अॅग्रीगेटर पॉलिसीबाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेक लिमिटेड (PB Fintech Ltd), सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड, एसजेएस एंटरप्रायझेस (SJS Enterprises Limited) आणि सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries) यांचा समावेश आहे. हे आयपीओ (IPO) ३ नोव्हेंबरला बंद होतील.

पॉलिसी बाजार आणि पैसा बाजारचे ऑपरेटर पीबी फिनटेक लिमिटेडचा ५,७०० कोटी रुपयांचा आयपीओ आज उघडत आहे. यामध्ये ३,७५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर १,९६० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहे. किमान १५ इक्विटी शेअर्सची बोली लावता येईल. इश्यूचा १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहे.

पॉलिसी बाजारने आयपीओच्या आधी १५५ अँकर गुंतवणूकदारांकडून २,५६९ कोटी रुपये जमा केले आहेत. कंपनीला अँकर स्लॉटमध्ये जवळपास ४० पट बोली मिळाली. यामध्ये एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, बजाज अलियान्झ लाइफ, एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि मॅक्स लाईफ इन्शुरन्ससारख्या सुप्रसिद्ध विमा कंपन्यांचा समावेश होता.

याशिवाय फिडेलिटी, बेली गिफर्ड, ड्रॅगोनियर ग्रुप, ब्लॅकरॉक आदी कंपन्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. पीबी फिनटेकचे विद्यमान गुंतवणूकदार स्टीडव्हिव कॅपिटल, टायगर ग्लोबल आणि फाल्कन एज यांनी अँकर गुंतवणुकीद्वारे कंपनीतील त्यांची गुंतवणूक दुप्पट केली आहे.

एसजेएस एंटरप्रायझेस लिमिटेडचा ८०० कोटी रुपयांचा IPO खुला झाला आहे. यासाठी ५३१ रुपयांवरून ५४२ रुपयांपर्यंत प्राइस बँड ठेवण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान २७ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. म्हणजेच त्यांना १४,६३४ रुपये गुंतवावे लागतील.

सिगाची इंडस्ट्रीजचा १२५.४३ कोटी रुपयांचा आयपीओ देखील सोमवारी (१ नोव्हेंबर) उघडत आहे. यासाठी १६१-१६३ रुपये प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली आहे. ७६.९५ लाख शेअर्स जारी करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी या रकमेचा वापर आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी करेल. हे देशातील सेल्युलोज आधारित एक्सिपियंट्सच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे आणि ४१ देशांमध्ये निर्यात करते. त्याचा ६० टक्के महसूल निर्यातीतून येतो.

सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेडचा IPO खुला झाला आहे. याद्वारे २९.५० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. ८ नोव्हेंबरला बंद होणार आहे. गुंतवणूकदारांकडे या इश्यूसाठी बोली लावण्यासाठी ८ दिवस आहेत. यासाठी ४५ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शेअर्सच्या एका लॉटची किंमत ३००० रुपये आहे. या इश्यूचा एकूण आकार ३१,११,००० शेअर्स आहे.