'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:55 IST2026-01-15T13:39:57+5:302026-01-15T13:55:07+5:30
१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेलं युद्ध कोणीही विसरू शकत नाही. त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि आर्थिक आव्हानांशी झुंजत होता. अशा कठीण प्रसंगी बिहारच्या दरभंगा राजघराण्यानं देशाला मोठी आर्थिक मदत केली होती. या राजघराण्याच्या महाराणीने तर आपल्या खजिन्यातून शेकडो किलो सोनं दान केलं होतं.

दरभंगा राजघराण्याच्या महाराणी कामसुंदरी देवी यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या भारतीय लष्करासाठी आपला खजिना खुला केला होता. त्यांनी सुमारे ६०० किलोग्रॅम सोनं दान केलं होतं. याशिवाय, दरभंगा राजघराण्यानं आपल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवलेली ३ खासगी विमानंदेखील देशाला दान केली होती. इतकेच नाही तर ९० एकरात पसरलेले खाजगी विमानतळही देशाच्या वापरासाठी दिले होते. आज याच जमिनीवर 'दरभंगा विमानतळ' कार्यरत आहे.

महाराणी कामसुंदरी देवी या महाराजाधिराज कामेश्वर सिंह यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. महाराजा कामेश्वर सिंह यांचं निधन १९६२ च्या चीन युद्धापूर्वीच झालं होतं, त्यामुळे सोनं दान करण्याचा निर्णय महाराणी कामसुंदरी देवी यांनाच घ्यावा लागला होता.

दरभंगा राजघराण्याकडे अफाट खजिन्याशिवाय मोठी अचल संपत्तीही होती. १९६२ मध्ये या राजघराण्याकडे सुमारे २,००० कोटी रुपयांची संपत्ती होती, ज्यामध्ये जमीन, राजवाडे, दागिने, कंपन्या आणि गुंतवणुकीचा समावेश होता. संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी राजघराण्यानं 'कामेश्वर सिंह रिलिजिअस ट्रस्ट' स्थापन केला होता. या ट्रस्टकडे १ लाख एकर जमीन आणि २ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा खजिना होता.

दरभंगा राजघराण्याकडे अफाट खजिन्याशिवाय मोठी अचल संपत्तीही होती. १९६२ मध्ये या राजघराण्याकडे सुमारे २,००० कोटी रुपयांची संपत्ती होती, ज्यामध्ये जमीन, राजवाडे, दागिने, कंपन्या आणि गुंतवणुकीचा समावेश होता. संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी राजघराण्यानं 'कामेश्वर सिंह रिलिजिअस ट्रस्ट' स्थापन केला होता. या ट्रस्टकडे १ लाख एकर जमीन आणि २ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा खजिना होता.

राजघराण्याने १९६२ मध्ये जे सोने दान केले होते, त्याचे त्यावेळचे मूल्य सुमारे ३ कोटी रुपये होते. आजच्या सोन्याच्या दराप्रमाणे (१.४० लाख रुपये प्रति १० ग्रॅम) विचार केला तर, या ६०० किलोग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ८,५०० कोटी रुपये होईल. याचा अर्थ असा की, त्या काळी राजघराण्याने लष्कराच्या मदतीसाठी आजच्या हिशोबात ८.५ हजार कोटी रुपयांचे दान दिले होते. राजघराण्याची एकूण संपत्ती १९६२ च्या किमतीनुसार सुमारे १० हजार कोटी रुपये होती. सध्या या संपत्तीची देखभाल ट्रस्ट करत असून त्याची जबाबदारी कुमार कपिलेश्वर सिंह यांच्याकडे आहे.

दरभंगा राजघराणे देशातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांपैकी एक मानले जाते. याला 'खांडवाला वंश' असंही म्हणतात, जे मैथिल ब्राह्मण राजवंश होते. याची स्थापना १५५७ मध्ये मुघल सम्राट अकबरने केली होती. त्यावेळी अकबरने महेश ठाकूर यांची मिथिलाचे शासक म्हणून नियुक्ती केली होती. १६८४ मध्ये औरंगजेबानं याला स्वतंत्र केलं आणि पुढे ब्रिटीश राजवटीत याला 'जमीनदारी' म्हणून घोषित करण्यात आलं. अशा प्रकारे हे राजघराणं सुमारे ४६९ वर्षे जुनं आहे.

ब्रिटीश काळात दरभंगा हे देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत जमीनदारांपैकी एक होते. तेव्हा ही संस्थान १०,३६० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं होतं आणि त्यात ४,५०० गावं येत होती. १८ व्या शतकातही त्यांची वार्षिक कमाई सुमारे ४० लाख रुपये होती, जी इतर अनेक संस्थानांच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त होती.

१९६२ मध्ये महाराजांच्या निधनावेळी या राजघराण्याकडे १४ मोठ्या कंपन्या, देश-विदेशात बंगले, अब्जावधींचे दागिने आणि मोठी जमीन होती. आजच्या हिशोबात या सर्व संपत्तीची किंमत सुमारे ४ लाख कोटी रुपयांच्या आसपास होती. १९५० मध्ये जमीनदारी प्रथा संपल्यानंतर आता या घराण्याकडे केवळ २ टक्के जमिनी उरल्या आहेत.

राजघराण्याच्या सर्वात मौल्यवान गोष्टींमध्ये राजवाडे आणि दागिन्यांचा समावेश होतो. दरभंगा राजघराण्याचे 'लॉस्ट ज्वेलरी' (दुर्मिळ दागिने) प्रसिद्ध होते, ज्यात हिरे, मोती आणि रत्नांच्या माळांचा समावेश होता. १९ व्या शतकात त्यांची किंमत १ कोटी रुपयांच्या आसपास सांगितली गेली होती.

















