Corona Pandemic Unemployment: कोरोना वाढला की रोजगार जाणार? काय सांगतोय सीएमआयईचा धक्कादायक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 12:08 PM2022-01-06T12:08:48+5:302022-01-06T12:11:52+5:30

Corona Pandemic Unemployment: ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील बेरोजगारी जलदगतीने वाढत असल्याचे आढळून आले. कोरोना वाढला व लॉकडाऊन लागला की बेरोजगारी वाढते, रोजगार जातात हा अनुभव आहे.

कोरोना महासाथीचा मुक्काम लांबत चालला असल्याने त्याचा परिणाम रोजगारसंधींवरही झाला आहे. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला असता रोजगाराच्या संधी आटत चालल्या असल्याचे प्रकर्षाने जाणवून येत आहे.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील बेरोजगारी जलदगतीने वाढत असल्याचे आढळून आले. कोरोना वाढला व लॉकडाऊन लागला की बेरोजगारी वाढते, रोजगार जातात हा अनुभव आहे. ते होऊ द्यायचे नसेल तर नियम पाळावे लागणार आहेत.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) यांनी अलीकडेच अहवाल जारी केला. डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर ७.९१ टक्क्यांवर पोहोचल्याची नोंद या अहवालात केली आहे.

गेल्या चार महिन्यांपेक्षा बेरोजगारीचा हा दर मोठा असल्याचे सीएमआयईचे म्हणणे आहे. ऑक्टोबर वगळता २०२१ मध्ये ११ महिने ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बेरोजगारी सातत्याने वाढत राहिली.

खरिपाचा हंगाम संपल्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने तरुण मुले रोजगारासाठी शहराकडे वळली. सुगीचा हंगाम संपल्यानंतर गावात शेतीची कामे फारशी नसतात त्यामुळे मुले शहराकडे जात असतात. या कारणांमुळे डिसेंबरमध्ये बेरोजगारी वाढली.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ही संख्या सुमारे ८५ लाख एवढी होती. त्यातील ४० लाख मुलांना काम मिळाले.

टॅग्स :नोकरीjob