उद्यापासून बदलणार 'हे' 5 महत्त्वाचे नियम; जाणून घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 03:59 PM2022-07-31T15:59:12+5:302022-07-31T16:08:20+5:30

Changes From 1st August : जर करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होतेय. दर महिन्याच्या 1 तारखेला होणाऱ्या बदलांप्रमाणेच या वेळीही काही बदल होतील. यामध्ये बँकिंग सिस्टिम, गॅसची किंमत, आयटीआर रिटर्न इत्यादींशी संबंधित काही प्रमुख अपडेटचा समावेश आहे. या नियमांमधील बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे.

जर तुम्ही 31 जुलैपर्यंत तुमचे रिटर्न फाइल केले नाही तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला दंडासह आयटीआर फाइल लागेल. आयकरदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, त्याला 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. त्याचवेळी, जर करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan) ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत आहे. 1 ऑगस्टपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत. जर तुम्ही 31 तारखेपर्यंत ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला 12 व्या हप्त्यासाठी पैसे मिळणार नाहीत. यासाठी, तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन ई-केवायसी करून घेऊ शकता.

तुमचे खाते बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) असल्यास, 1 ऑगस्टपासून चेकद्वारे पैसे भरण्याचे नियम बदलतील. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना कळवले आहे की 1 ऑगस्टपासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल.

दर महिन्याच्या पहिल्याप्रमाणे यंदाही 1 ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करू शकतात. यावेळी एका सिलिंडरचा दर 20 ते 30 रुपयांनी बदलू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, गेल्या वेळी व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता, तर घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी वाढला होता.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा (PMFBY) लाभ घेण्यासाठी तुम्हाला योजनेमध्ये तुमच्या पिकाचा विमा उतरवावा लागेल. त्याच्या नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यानंतर कोणाचीही नोंदणी होणार नाही आणि तुम्ही योजनेपासून वंचित राहू शकता. तुम्ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन पूर्ण करू शकता.

याचबरोबर, ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण येत आहेत. या कारणास्तव, यावेळी विविध राज्यांसह एकूण 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने देखील आपल्या यादीत जाहीर केले आहे की, ऑगस्टमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि चार रविवार असे एकूण 18 दिवस बँका बंद राहतील.