Changes from 1st April: १ एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; वाचा महागणाऱ्या संपूर्ण वस्तूंची ‘ही’ यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:13 AM2021-03-31T10:13:12+5:302021-03-31T10:18:28+5:30

Changes from 1st April that will affect your life: १ एप्रिल २०२१ पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होत आहे, उद्यापासून अनेक वस्तू महागणार आहेत, ज्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या बजेटला बसणार आहे.

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात होत आहे, परंतु या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा झटका बसणार आहे. कारण रोजच्या वापरात असणाऱ्या अनेक वस्तूंचे दर वाढणार आहेत, यात कोणकोणत्या वस्तूंचे भाव वाढणार याबाबत जाणून घेऊया

मारुती सुजुकीसह अनेक वाहन कंपन्या १ एप्रिल २०२१ पासून कार आणि दुचाकीच्या किंमती वाढवणार आहेत. मारुती सुजुकीसह Nissan आणि रॅनो यांच्या गाड्या महागतील.

तर दुचाकीमध्ये हिरो कंपनीच्या गाड्या महागणार असल्याची घोषणा केली आहे. तर शेतकऱ्यांनाही आर्थिक वर्षात महागाईचा फटका बसेल कारण ट्रॅक्टरचे दरही वाढणार आहेत.

१ एप्रिल २०२१ पासून टेलिव्हिजनचे दरही वाढणार आहेत. मागील काही महिन्यांपासून टीव्हीचे दर वाढत आहेत. यातच टीव्हीचे दर आर्थिक वर्षात २ हजार ते ३ हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चीनमधून आयात वस्तूंवर बंदी आणल्यानंतर टीव्हीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आर्थिक वर्षात मोबाईल फोनही महागणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर इंपोर्ट ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली. ज्यात मोबाईल पार्टस, चार्जर, एडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोन यांचा समावेश आहे. इंपोर्ट ड्यूटी वाढल्याने मोबाईलच्या किंमतीत वाढ होईल.

सध्या उष्णतेचे वातावरण असल्याने AC आणि फ्रिज घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, यातच या ग्राहकांनाही फटका बसण्याची चिन्हे आहेत. नव्या आर्थिक वर्षात एसी आणि फ्रिजचे दर वाढतील. कंपनीने कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याचं कारण पुढे केले आहे.

एअर कंडिशनरच्या दरात १५०० ते २००० पर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये ओपन सेल पॅनेलचे दर ३५ टक्क्यांनी वाढले होते.

नागरी विमान महासंचलनालयने एअर सिक्युरिटी शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे विमान वाहतूक महाग होणार आहे. डोमेस्टिक विमान वाहतुकीचे दर ५ टक्क्यांनी वाढतील. देशातंर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअरपोर्ट सिक्युरिटी शुल्क म्हणून २०० रुपये तर परदेशी प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागतील.

विमा कंपन्यांनी १ एप्रिलपासून Insurance प्रिमीयम महाग करण्याची तयारी केली आहे. यंदा प्रिमीयममध्ये १०-१५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कोरोना संकटामुळे कंपन्यांचा विमा आणि खर्च कित्येक पटीने वाढला आहे.

स्टील बनवण्याच्या कंपन्या किंमतीत वाढ करण्याची तयारी केली आहे. जेएसडब्ल्यू स्टील, जेएसपीएल, एम-एनएस आणि टाटा स्टील, एचआरसी कंपन्या ४ हजार रुपये टनामागे वाढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये टनामागे २५०० रुपये वाढले होते.

उत्तर प्रदेशात दारूच्या किंमतीत १ एप्रिलपासून वाढ होईल. नव्या किंमतीने दारू विक्री होईल. १ एप्रिलपासून देशी आणि विदेशी दोन्ही दारूच्या किंमती वाढतील. उत्तर प्रदेश सरकारने परमिट शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत बियर स्वस्त होतील.