नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:40 IST2025-09-27T16:33:15+5:302025-09-27T16:40:00+5:30
Navratri 2025 Gold Price: नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आठवड्याच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे थोडा दिलासा मिळाला होता. पण...!25

भारतीय बाजारात शनिवारी (२७ सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या तेजीने आठवड्याच्या सुरुवातीला झालेली घसरण भरून काढली आहे. यानंतर आता सोने पुन्हा एकदा सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले आहेत.
अशी आहे आजची स्थिती - २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत आज तब्बल ₹६०० ची वाढ झाली आणि सोन्याचा दर थेट ₹१,१५,४८० प्रति १० ग्रॅमवर जाऊन पोहोचला. याच बरोबर २२ कॅरेट सोनेही ₹५५० ने वाढून ₹१,०५,८५० वर पोहोचले आहे.
१८ कॅरेट सोन्याचा विचार करता, याचा भावही ₹४५० ने वाढून ₹८६,६१० प्रति १० ग्रॅमवर जाऊन पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, वर्षभरातच सोन्याच्या दरात तब्बल ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आठवड्याच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, सलग दोन दिवसांच्या वाढीने त्यांच्या इच्छांवर विरजन पडले आहे
काय आहे तेजीचं कारण? - सोन्याच्या दरात ही तेजी, काही आंतरराष्ट्रीय आणि भू-राजकीय घडामोडींमुळे आली आहे. अमेरिकेचा H1B व्हिसा, भारत-अमेरिका व्यापार चर्चा, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची अनिश्चितता आणि इतर जागतिक बदल, यांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा एकदा सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.
चांदीही तेजीत: सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा भाव ₹१४९ प्रति ग्रॅम म्हणजेच ₹१,४९,००० प्रति किलो वर पोहोचला आहे. चांदीही आपल्या सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या ट्रेझरी कर्जाचे वाढते ओझे आणि फेडच्या स्वायत्ततेवरील धोक्याच्या चिंतेमुळे सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या शहरांतील दर - चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११,६०८ रुपये आहे, तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे १०,६४० रुपये आणि ८,८१० रुपये आहे.
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे आज २४ कॅरेट सोन्याच्या १ ग्रॅमचा दर ११,५४८ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅम १०,५८५ रुपये तर १८ कॅरेट सोन्याचा दर ८,६६१ रुपये एवढा आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ११,५५३ रुपये, तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे १०,६४० रुपये आणि ८,८१० रुपये आहे.