सरकारकडून पॅकेजची अपेक्षा, टेलिकॉम क्षेत्राच्या शेअर्सला मिळाला बूस्ट; Airtel चं मार्केट कॅप ४ लाख कोटींच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:22 PM2021-09-15T18:22:11+5:302021-09-15T18:38:05+5:30

AGR थकबाकी असलेल्या दूरसंचार कंपन्यांसाठी मोठे मदत पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

AGR थकबाकी असलेल्या दूरसंचार कंपन्यांसाठी मोठे मदत पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी प्रोडक्ट लिंक्ड इन्सेटिव्ह स्कीम आणि सोबत कॅस स्टॅप्ड दूरसंचार क्षेत्रासाठी बहुप्रतिक्षित मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली. मात्र, सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही.

या दरम्यान, दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी एअरटेलच्या शेअरच्या (Airtel Share Price) किमतीत प्रचंड वाढ दिसून आली आहे. तसंच यामुळे कंपनीचं बाजार भांडवलही ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

हा टप्पा पार करणारी एअरटेल ही बारावी भारतीय फर्म आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँक यांनी ही कामगिरी केली आहे.

बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी दिवशी, एअरटेलच्या शेअरची किंमत ७३४ रुपयांवर पोहोचली होती. कंपनीच्या शेअरनं हा टप्पा गाठत ५२ आठवड्यांचा उच्चांकही गाठला.

शेअर बाजाराच्या अखेरच्या टप्प्यात एअरटेलचा शेअर ४.८० टक्क्यांच्या वाढीसह ७२७.५० रूपयांवर बंद झाला. एअरटेलच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ४३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone-Idea) शेअर्समध्ये ४५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. भारती एअरटेलनं गेल्या १२ सत्रांमध्ये २३ टक्क्यांची वाढ नोंदवली. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्येही गेल्या दोन आठवड्यांमध्ये ३३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून व्होडाफोन-आयडिया म्हणजेच Vi कंपनीविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कुमार मंगलम बिर्ला यांनी केंद्राला लिहिलेले पत्र आणि त्यानंतर दिलेला राजीनामा यामुळे २७ कोटी ग्राहक आणि काही बँकांना चांगलीच धडकी भरली.

Vi भविष्य काय याचाच सर्वांना प्रश्न पडला आहे. Vi चा पाय आणखी खोलात गेला असून, कंपनीला चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत तब्बल ७ हजार ३१९ कोटींचा प्रचंड तोटा झाला आहे. कंपनीची तिमाही पातळीवर सुमार कामगिरी ठरली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर काही बँकांनी केंद्रातील मोदी सरकारला कर्जाची परतफेड करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला अधिक वेळ देण्याचं आवाहन केलं होतं. Vi वर सध्या १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे प्रतिनिधी या महिन्यात वित्त आणि दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांना भेटले. बँक अधिकाऱ्यांनी सरकारला प्रस्ताव दिला की Vi ला थकबाकी भरण्यासाठी त्वरित सवलत दिली जावी.

Vi ने स्टेट बँकेकडून तब्बल ११ हजार कोटींचे कर्ज घेतले असून, येस बँकेकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. तसेच इंडसइंड बँकेकडून ३ हजार ५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. Vi अखेरच्या घटका मोजत असल्याची वृत्त बाजारात येताच या तीन बँकांपुढील समस्या वाढल्या असून, कंपनी बंद झाली, तर या बँकांना मोठे नुकसान सोसावं लागू शकतं, असे सांगितलं जात आहे.