भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:45 IST2025-04-21T10:41:50+5:302025-04-21T10:45:35+5:30
renewable energy powered city : भविष्यातील उर्जेची मागणी आणि प्रदूषण या समस्येवर उपाय म्हणून पूर्णपणे अक्षय्य उर्जेवर चालणारे शहर भारतात विकसित होणार आहे. हे जगातील पहिले शहर असेल असा दावा केला जात आहे.

दिवसेंदिवस जगात उर्जेची मागणी वाढत आहेत. तर दुसरीकडे पारंपरिक उर्जेचे स्त्रोत हे मर्यादीत असल्याने लवकरच संपून जातील. परिणामी भविष्यातील उर्जेची मागणी पूर्ण करण्याकरता मानवाला अक्षय उर्जेशिवाय पर्याय उरणार नाही. महत्त्वाचं म्हणजे जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि इतर ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन होते, ज्यामुळे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढते.
रिन्यूएबल एनर्जीमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा इत्यादींचा समावेश होतो, जे ऊर्जा निर्मितीच्या वेळी कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित करत नाहीत. याच धर्तीवर जगातील पहिले अक्षय्य उर्जेवर चालणारे शहर भारतात उभे राहत आहे.
आंध्र प्रदेशची भावी राजधानी अमरावती इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. हे शहर पूर्णपणे अक्षय्य ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर म्हणून उभारले जाणार आहे. शहर नियोजक आधुनिक आणि पर्यावरणपूरक 'पीपल्स कॅपिटल' बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २,७०० मेगावॅट अक्षय्य ऊर्जा निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह, शहराच्या सर्व वीज गरजा सौर, पवन आणि जलविद्युत यासारख्या शाश्वत स्रोतांपासून पूर्ण करण्याचा मानस आहे.
कृष्णा नदीच्या काठावर बांधल्या जाणाऱ्या या नवीन राजधानीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात करण्याची शक्यता आहे. ६५,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २१७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला असेल. तर आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र ८,३५२ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे.
मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, ही २,७०० मेगावॅट उर्जेचा प्रकल्प केवळ जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व संपवणे नाही, तर शाश्वत शहर म्हणून जगासाठी हा एक आदर्श असणार आहे.