मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:21 IST2025-11-05T18:20:37+5:302025-11-05T18:21:08+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला भनकही लागली नाही.

मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
बिहार विधानसभेसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र या पूर्वीच मुंगेर विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे उमेदवार संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भाजप उमेदवार कुमार प्रणय तसेच एनडीए आघाडीला पाठिंबा जाहीर केला. या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकीय समीकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला भनकही लागली नाही. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर मुंगेरमधील निवडणुकीची लढत आणखी रोचक बनली असून आता सामना थेट महागठबंधन आणि एनडीए यांच्यात होणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय सिंह यांचा मजबूत जनाधार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रियता एनडीएला निर्णायक आघाडी मिळवून देऊ शकते. दुसरीकडे, महाआघाडीत यामुळे स्पष्ट अस्वस्थता दिसून येत आहे. स्थानिक मतदारांमध्येही या राजकीय बदलावर जोरदार चर्चा सुरू असून, अनेकजण याला मुंगेरच्या राजकारणातील “गेमचेंजर” क्षण म्हणत आहत.
संजय सिंह हे सध्या जिल्हा परिषदेचे सदस्य असून सलग तिसऱ्यांदा या पदावर निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी झालेल्या या घडामोडीने महाआघाडीच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. आता भाजप या नव्या समीकरणाचा किती प्रभावी फायदा करून घेतो, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.