टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत? पाहा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:44 AM2023-01-07T09:44:22+5:302023-01-07T10:02:18+5:30

दूरसंचार कंपन्या सध्या प्लॅन्सच्या किंमतीमध्येही वाढ करण्याचा विचार करत आहेत.

Airtel आणि Jio सारख्या दूरसंचार कंपन्या आपल्या 5G नेटवर्कचा सतत्याने विस्तार करत आहेत. पण एकीकडे या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी हे नवे तंत्रज्ञान आणत असताना दुसरीकडे कंपन्या प्लॅन्सच्या किंमतीमध्येही वाढ करण्याचा विचार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जिओ आणि एअरटेल त्यांचा रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढवण्यासाठी त्यांच्या विद्यमान प्लॅनच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढवू शकतात.

बिझनेस इन्साईडरच्या वृत्तानुसार विश्लेषक जेफरीजच्या अहवालानुसार Jio आणि Airtel सह दूरसंचार कंपन्या पुढील 3 वर्षांच्या प्रत्येक चौथ्या तिमाहीत म्हणजे FY23, FY24 आणि FY25 मध्ये दरांमध्ये 10 टक्के वाढ जाहीर करू शकतात. याचा अर्थ असा की येत्या काही वर्षांत, प्रत्येक चौथ्या तिमाहीत ग्राहकांना प्लॅनच्या किमती वाढताना दिसतील.

यासोबतच या अहवालात असेही म्हटले आहे की, कंपन्यांवर रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढवण्याच्या दबावामुळे त्यांना किमतीत वाढ करणे भाग पडले आहे. तिसर्‍या तिमाहीत जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या दूरसंचार कंपन्यांचा परफॉर्मन्स दाखवणारा एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर तिसऱ्या तिमाहित किरोकोळ वाढला आहे. टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर कंपन्यांचे ARPU वाढेल.

एअरटेलने सध्याच्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे आणि स्वस्त प्लॅन काढून कमी करण्यासही सुरूवात केली आहे. अलीकडेच कंपनीने काही ठिकाणी लाँच केलेला 99 रुपयांचा प्लॅनही आपल्या लिस्टमधून काढून टाकला आहे.

यामध्ये ग्राहकांना 1GB डेटा, 100 SMS, Airtel Xstream, Wynk Music आणि Zee5 वर 18 दिवसांसाठी प्रीमियम ऍक्सेस मिळत होता. हा प्लॅन छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तर प्रदेश पूर्वेसह निवडक सर्कल्समध्ये उपलब्ध होता.

मात्र, आता हा प्लॅन हटवण्यात आलाय. याऐवजी, एअरटेलने किंमत वाढीसह प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. ज्यामध्ये 99 रुपयांचा प्लॅन आता 155 रुपयांना उपलब्ध आहे.

टेलिकॉम कंपन्यांचा रेव्हेन्यू त्यांचे ग्राहक जोडण्यावर अवलंबून असतो. गेल्या काही महिन्यांत, एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहक संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि या दोन्ही कंपन्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत.

त्याच वेळी व्होडाफोन आयडियाला ग्राहकांच्या बाबतीत सतत नुकसान सहन करावा लागत आहे. वास्तविक Jio आणि Airtel च्या 5G सेवेमुळे Vi ला मोठे नुकसान होत आहे. यासोबतच कंपनी आर्थिक संकटाचाही सामना करत आहे, त्यामुळे सध्या कंपनीने 5G सेवा सुरू केलेली नाही.