६ वर्षांनी डिसेंबरमध्ये शेअर बाजारात आला मोठा भूकंप, गुंतवणूकदारांचे १८ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:21 PM2022-12-24T12:21:47+5:302022-12-24T12:29:25+5:30

शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांसाठी डिसेंबर महिना खास राहिला नाही. डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांसाठी डिसेंबर महिना खास राहिला नाही. डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. 1 डिसेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी स्तर गाठला होता. तरी आधी मंदीच्या बातम्यांचा प्रभाव आणि नंतर पुन्हा वाढत असलेल्या कोरोनामुळे शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम दिसून आला. डिसेंबर महिन्यातच गुंतवणूकदारांचे सुमारे 18 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

विशेष म्हणजे 2016 नंतर डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणजे 6 वर्षांनंतर डिसेंबर महिन्यात एवढी मोठी घसरण दिसून आली आहे. ज्याचा कोणालाच अंदाज आला नव्हता. 2016 ते डिसेंबर 2022 या कालावधीत कोणत्या वर्षात गुंतवणूकदारांचे किती नफा / नुकसान झाले आहे हे पाहूया.

डिसेंबर 2022 अजून संपलेला नाही आणि शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांचे सुमारे 18 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 1 डिसेंबर रोजी BSE चे मार्केट कॅप 2,89,88,217.01 कोटी रुपये होते जे 2,72,12,860.03 कोटी रुपयांपर्यंत खाली आले, म्हणजे मार्केट कॅपमध्ये 17,75,356.98 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

डिसेंबर 2021 मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सुमारे 7 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता. बीएसईचे मार्केट कॅप डिसेंबरमध्ये 2,59,28,403.81 कोटी रुपयांवरून 2,66,00,211.55 कोटी रुपयांवर पोहोचले होते. म्हणजे मार्केट कॅपमध्ये 6,71,807.74 कोटी रुपयांचा नफा झाला.

डिसेंबर 2020 मध्ये शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. त्या काळात गुंतवणूकदारांना सुमारे 12 लाख कोटी रुपयांचा मोठा फायदा झाला होता. त्या कालावधीत, बीएसईचे मार्केट कॅप डिसेंबर महिन्यात 1,76,22,871.54 कोटी रुपयांवरून 1,88,03,518.60 कोटी रुपयांपर्यंत वाढले होते. याचा अर्थ मार्केट कॅपमध्ये 11,80,647.06 कोटी रुपयांची वाढ झाली होती.

डिसेंबर 2019 मध्ये गुंतवणूकदारांना एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला होता. त्या कालावधीत, बीएसईचे मार्केट कॅप 1,54,37,429.06 कोटी रुपयांवरून 1,55,53,829.04 कोटींपर्यंत वाढले होते, म्हणजेच मार्केट कॅपमध्ये 1,16,399.98 कोटींनी वाढ झाली होती.

2018 डिसेंबर हे वर्ष सकारात्मक होते, गुंतवणूकदारांचा नफा एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी असला तरी तोटा झाला नाही. त्या वर्षी डिसेंबर महिन्यात, बीएसईचे मार्केट कॅप 1,43,52,444.61 कोटी रुपयांवरून 1,44,48,465.69 कोटी रुपयांपर्यंत वाढले होते. याचा अर्थ मार्केट कॅपमध्ये 96,021.08 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

2017 मध्ये डिसेंबर महिन्यात बाजारातील गुंतवणूकदारांना 7 लाख कोटी रुपयांहून अधिक फायदा झाला होता. त्या वर्षी, BSE चे मार्केट कॅप 1,44,51,998.53 कोटींवरून 1,51,73,866.88 कोटी रुपयांपर्यंत वाढले होते, म्हणजेच BSE चे मार्केट कॅप 7,21,868.35 कोटींनी वाढले होते.

2016 मध्ये बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्या काळात BSE चे मार्केट कॅप 1,07,23,336.51 कोटींवरून 1,06,23,347.05 कोटी रुपयांवर आले होते, म्हणजेच BSE चे मार्केट कॅप 99,989.46 कोटी रुपयांनी कमी झाले होते.