१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:32 IST2025-09-25T09:21:29+5:302025-09-25T09:32:10+5:30
October 2025 New Rule: काही दिवसांतच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून देशातील अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबरपासून कोणते ७ नियम बदलणार आहेत, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.

October 2025 New Rule: आता काही दिवसांतच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होईल. सर्वात महत्त्वाचा बदल राष्ट्रीय पेन्शन प्रणालीशी (NPS) संबंधित आहे, जिथे आता गुंतवणूकदार एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. याशिवाय, ऑनलाइन गेमिंगपासून ते ईपीएफमध्येही या महिन्यात बदल होणार आहेत. चला तर, जाणून घेऊया १ ऑक्टोबर २०२५ पासून कोणते ७ मोठे बदल होणार आहेत.
१. ऑनलाइन गेमिंगचे नियम बदलतील
ऑनलाइन गेमिंगच्या जगात १ ऑक्टोबरपासून मोठा बदल होणार आहे. नवीन नियम लागू होण्याआधी सरकारनं गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर संबंधितांशी चर्चा केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला आधीच मंजुरी दिली आहे. या नियमांचा उद्देश ऑनलाइन गेमिंगला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणं आहे, जेणेकरून खेळाडूंना फसवणुकीपासून वाचवता येईल आणि कंपन्यांवरही कठोर नियंत्रण ठेवता येईल.
२. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल
१ ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये सुरुवातीची १५ मिनिटे फक्त त्या प्रवाशांना मिळतील, ज्यांचं IRCTC खातं आधारशी जोडलेले आणि पूर्णपणे ऑथेंटिकेटेड (fully authenticated) असेल. हा नियम तत्काळ तिकीट बुकिंगप्रमाणे तयार करण्यात आला आहे, जेणेकरून दलाल आणि एजंट्सच्या मनमानीवर लगाम बसेल.
३. UPI "कलेक्ट रिक्वेस्ट" होणार बंद
१ ऑक्टोबर २०२५ पासून यूपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी एक मोठा बदल होऊ शकतो. आता तुम्ही फोनपे (PhonePe), गुगल पे (GPay) किंवा इतर कोणत्याही पेमेंट ॲपवरून थेट तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा कोणत्याही व्यक्तीकडे पैसे मागू शकणार नाही. खरे तर, यूपीआयचे "कलेक्ट रिक्वेस्ट" किंवा "पुल ट्रान्झॅक्शन" हे फीचर पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. हे तेच फीचर आहे, ज्याद्वारे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी पेमेंटची रिक्वेस्ट पाठवून पैसे मागू शकत होता. ऑनलाइन फसवणूक आणि फिशिंगपासून बचाव करण्यासाठी एनपीसीआयनं हे पाऊल उचललंय आहे, जेणेकरून यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित होतील.
४. पीएफ खातेधारकांसाठी दिलासा
ऑक्टोबर महिन्यात पीएफ (PF) खातेधारकांना सरकारकडून मोठी भेट मिळू शकते. १०-११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत असा प्रस्ताव ठेवला जाईल की, सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातून एटीएममधून थेट पैसे काढू शकतील. या बैठकीत किमान पेन्शन १,००० रुपयांवरून १,५००-२,५०० रुपयांपर्यंत वाढवण्यावरही चर्चा होऊ शकते. यासोबतच, ऑक्टोबरमध्ये ईपीएफओ (EPFO) आपली नवीन डिजिटल सेवा 'EPFO 3.0' सुरू करू शकते.
५. एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलण्याची शक्यता
दर महिन्याप्रमाणेच, या वेळीही १ ऑक्टोबर २०२५ रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल दिसून येऊ शकतो. गेल्या महिन्यात किंमत १६३१.५० रुपयांवरून कमी होऊन १५८० रुपये झाली होती. मात्र, नुकताच जीएसटी दर कमी झाल्यानंतरही गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या नव्हत्या.
६. NPS मध्ये मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये एक मोठी सुधारणा केली आहे, जी १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. या सुधारणेला 'मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क' असं नाव देण्यात आलं आहे. याअंतर्गत, आता गैर-सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स एकाच पॅन क्रमांकाद्वारे अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे सेवानिवृत्तीचं नियोजन अधिक मजबूत आणि सुरक्षित करता येईल.
७. एकाच पॅन क्रमांकावर अनेक योजनांमध्ये गुंतवणूक
पीएफआरडीएच्या नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) अंतर्गत एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. यापूर्वी फक्त एकाच योजनेत गुंतवणुकीची परवानगी होती, पण आता गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडू शकतील. त्यामुळे, जर एखाद्याला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तो बॅलन्स्ड किंवा डेट स्कीम निवडू शकतो, तर जास्त परतावा मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार १००% इक्विटी आधारित योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतील.