४२ लाखांची नोकरी सोडली, दोनदा आलं अपयश; आज आहेत १५० कोटींच्या कंपनीचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:57 AM2023-08-24T09:57:33+5:302023-08-24T10:07:07+5:30

त्यांचं स्टार्टअप शिक्षण क्षेत्रातील जगातील टॉप १० कंपन्यांपैकी एक बनलं आहे.

आयुष्यातील ध्येय कितीही मोठं असो, त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत केली आणि मनात जिद्द असली तर यश नक्कीच मिळतं. अनेक लोक शिक्षणानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहतात. दुसरीकडे रोहित मांगलिक यांनी भरघोस पॅकेजची नोकरी सोडून स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.

रोहित यांनी नोकरी सोडली तेव्हा त्यांना वार्षिक ४२ लाख रुपयांचे पॅकेज मिळत होतं. पण त्यांनी आपली मोठ्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यानंतर स्वतःचा स्टार्टअप सुरू करणं सोपं नव्हतं.

सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. त्यांच्या पदरी अनेकदा अपयशही आलं, पण त्यांनी हार मानली नाही. याचाच परिणाम म्हणजे आज रोहित यांच्या कंपनीचा जगातील टॉप कंपन्यांच्या यादीत समावेश झाला आहे.

रोहित मांगलिक यांनी २०१२ मध्ये एनआयटीमधून बीटेक केलं. त्यानंतर आयटी क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं. यानंतर ते २०१७ मध्ये नोकरी सोडून फारुखाबादला परतले. जॉब करताना कुठेतरी अडकून राहिल्यासारखं वाटत होतं, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

दरम्यान, एका कंपनीत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची भेट घेतली. डॉ.कलाम म्हणाले होते की, स्वत:चा कधीही विचार करू नका, जेव्हा तुम्ही देशासाठी विचार कराल, तेव्हाच तुम्ही काहीतरी चांगलं करू शकाल. यानंतर त्यांनी स्वतःच्या स्टार्टअपचा विचार केला.

नोकरी सोडल्यानंतर त्यांनी ७ कर्मचाऱ्यांसोबत करिअर कौन्सिलिंग सुरू केलं. छोट्या शहरात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आणि अपयश आलं. यानंतर त्यांनी लखनऊच्या पत्रकारपुरममध्ये ऑफिस सुरू उघडलं आणि काम सुरू केलं. यातही त्यांना अपयश आलं.

रोहित मांगलिक यांनी २०२० मध्ये EduGorilla नावाचे स्टार्टअप सुरू केलं. तीन वर्षात हे स्टार्टअप शिक्षण क्षेत्रातील जगातील टॉप १० कंपन्यांपैकी एक बनलं आहे. EduGorilla मध्ये सध्या ३०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची वार्षिक टर्नओव्हर सुमारे दहा कोटी आहे. कंपनीचं यश पाहून परदेशी कंपन्यांनीही त्यात गुंतवणूक केली आहे.

दोनदा अपयशी ठरल्यानंतर रोहित यांना त्यांच्या अपयशातून खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुलांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. इंटर उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मार्गदर्शन करायला कोणीच नाही. यावर उपाय म्हणून २०२० मध्ये तरुणांच्या एका टीमनं EduGorilla नावाचं अॅप तयार केलं.

हे अॅप विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची अचूक माहिती देते. हे अॅप घरोघरी पोहोचवण्यासाठी अनेक कोचिंग इन्स्टिट्यूट्सना भेटून, त्यांच्या गुणवत्तेबद्दल सांगितलं. टीमच्या मेहनतीमुळे कंपनीनं देशभरातील ३००० संस्थांशी करार केला आहे. सध्या ७० हजारांहून अधिक विद्यार्थी कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांशी जोडले गेलेले आहेत.