जबरदस्त! फक्त ५ टक्के व्याजावर २ लाख रुपयांचं कर्ज, जाणून घ्या पीएम विश्वकर्मा योजनेतील 'या' महत्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:34 AM2023-08-17T10:34:09+5:302023-08-17T10:38:09+5:30

केंद्र सरकारने 'पीएम विश्वकर्मा योजना' सुरू केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 'पीएम विश्वकर्मा योजनेला मंजूरी दिली आहे. यावर १३ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. याद्वारे गुरु-शिष्य परंपरेनुसार कौशल्य वाढविणाऱ्या कामगारांचा कौशल्य विकास करण्यात येणार असून त्यांना पतपुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

या योजनेंतर्गत कारागिरांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५% सवलतीच्या दराने मिळेल. सरकारच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, विश्वकर्मा योजनेचा लाभ विणकर, सोनार, लोहार, कपडे धुण्याचे कामगार आणि नाई यांच्यासह ३० लाख कारागीर कुटुंबांना होणार आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ ते आर्थिक वर्ष २०२७-२८ या पाच वर्षांच्या कालावधीत या योजनेवर १३ हजार कोटी रुपये खर्च केले जातील आणि ३० लाख पारंपारिक कारागिरांना याचा लाभ मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले होते की, ही योजना विश्वकर्मा जयंती १७ सप्टेंबर रोजी सुरू केली जाईल. तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लहान शहरांमध्ये असे अनेक वर्ग आहेत जे गुरु-शिष्य परंपरेनुसार कौशल्यासंबंधीच्या कामात आहेत. यामध्ये लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, कुलूप, शिल्पकार इत्यादींचा समावेश होतो.

मंत्री वैष्णव म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या विभागांचे महत्त्वाचे स्थान असून त्यांना नवा आयाम देत मंत्रिमंडळाने 'पीएम विश्वकर्मा योजने'ला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून या योजनेचे संकेत दिले होते.

या विभागांना अधिकाधिक कौशल्य विकास कसा मिळेल आणि नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइन्सची माहिती कशी मिळेल याकडे लक्ष दिले जाईल, असंही केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले. या योजनेंतर्गत उपकरण खरेदीसाठीही मदत दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या अंतर्गत, दोन प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम असतील यामध्ये पहिला 'बेसिक' आणि दुसरा 'प्रगत' असेल. हा अभ्यासक्रम करणाऱ्यांना मानधनही मिळेल. कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिदिन ५०० रुपये मानधन देण्यात येणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

मंत्री म्हणाले की, या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर सवलतीचे व्याज देय असेल. व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज दिले जाईल.

अधिकृत निवेदनानुसार, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र देऊन ओळख दिली जाईल आणि ओळखपत्र देखील दिले जाईल. या योजनेंतर्गत, कारागिरांना डिजिटल व्यवहारांमध्ये प्रोत्साहन आणि बाजार समर्थन प्रदान केले जाईल. याअंतर्गत आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.