उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:11 IST2025-09-08T10:59:43+5:302025-09-08T11:11:07+5:30
Financial Freedom : येथे आपण पैसे वाचवण्याच्या १० अशा स्मार्ट सवयींबद्दल बोलत आहोत, ज्या तुम्ही आत्ताच अंगीकारल्यास तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि तुमच्या जीवनात आत्मविश्वास व समाधान वाढेल.

'थेंबे थेंबे तळे साचे' ही मराठी प्रसिद्ध म्हण तुम्हाला नक्कीच माहिती असेल. प्रत्येक मोठे स्वप्न छोट्या-छोट्या सवयींनीच साकार होते हेच यातून स्पष्ट होतं. जेव्हा आर्थिक यशाचा विषय येतो, तेव्हा बचत ही पहिली पायरी ठरते. तुम्ही जर फक्त १० बचतीच्या सवयी तुम्हाला लावून घेतल्या तरी काही वर्षात तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही.
कर्ज सुरुवातीला दिलासा देते, पण नंतर तुमच्या कमाईवर मोठे ओझे बनते. विशेषतः क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनसारख्या महागड्या कर्जांचा विचारपूर्वक वापर करा आणि सर्वात जास्त व्याज असलेल्या कर्जाची फेड आधी करा.
दर महिन्याचे बजेट तयार करा आणि लहान-मोठ्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा. यामुळे अनावश्यक खर्च ओळखणे सोपे होते आणि तुमची बचत वाढू लागते.
कोणत्याही अनिश्चित परिस्थितीत (जसे की आजारपण किंवा नोकरी जाणे) तुम्हाला कर्जावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाच्या बरोबरीचा आपत्कालीन निधी तयार करा.
स्वस्त आणि नकली वस्तू तात्पुरत्या फायद्याच्या वाटू शकतात, पण त्या लवकर खराब होतात आणि त्यांची दुरुस्ती किंवा बदली करण्यासाठी तुमचा खिसा रिकामा होतो. त्याऐवजी, चांगल्या दर्जाची वस्तू खरेदी करा, जी दीर्घकाळ टिकेल.
जेव्हाही महागडी वस्तू (जसे की फ्रिज, टीव्ही, बाइक) खरेदी करायची असेल, तेव्हा बाजारातील ऑफर्स, सेल किंवा कूपनचा फायदा घ्या. थोडेसे संशोधन केल्यास तुम्ही चांगली रक्कम वाचवू शकता.
क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा आणि वेळेवर बिल भरा. तसेच, नेटफ्लिक्स, ओटीटी ॲप्स, जिम किंवा इतर मेंबरशिप सबस्क्रिप्शन वेळोवेळी तपासा. ज्या सेवांचा तुम्ही वापर करत नाही, त्या लगेच बंद करा. हे छोटे-छोटे खर्च मिळून मोठा भार बनू शकतात.
तुमच्या मोबाईल प्लॅनची समीक्षा करा आणि गरजेनुसार स्वस्त किंवा फॅमिली प्लॅन निवडा. अनेकदा आपण अशा महागड्या प्लॅन्सचा वापर करत असतो, ज्यांची आपल्याला खरोखर गरज नसते.
वारंवार बाहेर खाल्ल्याने किंवा फिरल्याने मोठी रक्कम खर्च होते. महिन्यात किती वेळा बाहेर जायचे, याची मर्यादा निश्चित करा. घरी जेवण बनवणे आणि मित्र-मैत्रिणी व कुटुंबासोबत वेळ घालवणे हा स्वस्त आणि चांगला पर्याय असू शकतो.
बोनस, भेटवस्तू, कॅशबॅक किंवा इतर मिळकत अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याऐवजी बचत किंवा गुंतवणुकीत लावा. हे छोटे-छोटे उत्पन्न मोठे आर्थिक सहाय्य देऊ शकतात.
बचतीला एक महत्त्वाची आणि नियमित सवय बनवा, जसे तुम्ही जेवता किंवा झोपता. जेव्हा बचत तुमच्या स्वभावाचा भाग बनेल, तेव्हा विचारपूर्वक खर्च करण्याची सवय आपोआप लागेल. तसेच, घरातील छोटी-मोठी कामे (जसे की पेंटिंग किंवा दुरुस्ती) स्वतः करायला शिका. यामुळे व्यावसायिकांचे शुल्क वाचेल आणि तुम्हाला नवीन कौशल्येही शिकता येतील.