10 कोटी ग्राहकांना ₹400 स्वस्त मिळणार गॅस स‍िलिंडर, चेक करा आपलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:19 AM2023-08-30T09:19:46+5:302023-08-30T09:51:09+5:30

या लाभार्थ्यांना आता केवळ 703 रुपयांना मिळणार LPG सिलिंडर...!

महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हमून आता सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर, आता सर्व घरगुती ग्राहकांना LPG गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळेल.

आजपर्यंत राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 1103 रुपये एवढी होती. ती आता 903 रुपयांवर आली आहे. याशिवाय सरकार, उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देखील देणार आहे.

आता 903 रुपयांवर आले LPG स‍िलिडर - सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे निवडणुकीची तयारी म्हणून बघितले जात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सर्वांसाठी 200 रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती दिली. या निर्णयानंतर दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली आहे.

या लोकांना होणार 400 रुपयांचा फायदा - सरकारने LPG सिलिंडरवर 200 रुपयांची कपात केल्यानंतर, आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 400 रुपयांचा लाभ मिळणार आहे. कारण सरकार या योजनेतील लाभार्थ्यांना आधीच 200 रुपयांचे अनुदान देत आहे. यामुळे त्यांना LPG सिलिंडर 903 रुपयांना मिळत होते.

आता सरकारच्या या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर 200 रुपयांनी अधिक स्वस्त मिळेल. अर्थात उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना आता हे सिलिंडर केवळ 703 रुपयांना मिळणार आहे. सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

आणखी 75 लाख कुटुंबांना उज्ज्वलाचे कनेक्‍शन म‍िळाल्यानंतर, या योजनेतील नव्या लाभार्थ्यांची संख्या वाढून 10.35 कोटी रुपयांवर पोहोचेल. मध्य प्रदेशात सरकारने पुन्हा सत्तेवर आल्यास आपण 500 रुपयांत एलपीजी देऊ, असे आश्वासन दिले आहे.

याशिवाय, राजस्थानात काँग्रेसचे सरकार याच किमतीत एलपीजीचा पुरवठा करत आहे. या दोन्ही राज्यांत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत.

यासंदर्भात बोलताना ठाकूर म्हणाले, ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोदी सरकारने महिलांना दिलेली ही एक भेट आहे.