1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:52 IST2025-10-01T09:07:15+5:302025-10-01T09:52:44+5:30
ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून अनेक नवे नियम लागू होत आहेत. यामध्ये, एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून ते युपीआयपर्यंत अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा परिणाम प्रत्येक घराच्या आणि खिशावर दिसून येणार आहे

सप्टेंबर महिना संपला असून ऑक्टोबर २०२५ ची सुरुवात झाली आहे. या नवीन महिन्याची सुरुवात होताच, तो अनेक मोठे बदल (Rule Change From 1st October) घेऊन आला आहे, जे पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होत आहेत. यामध्ये, एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवून ऑइल कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे, तर दुसरीकडे UPI शी संबंधित नियमही बदलला आहे. या बदलांचा परिणाम प्रत्येक घराच्या आणि खिशावर दिसून येणार आहे. चला, अशाच पाच मोठ्या बदलांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया...
बदलांसह ऑक्टोबरची सुरुवात
प्रत्येक महिन्याची सुरुवात अनेक लहान-मोठ्या बदलांसह होते आणि यात आर्थिक बदलही समाविष्ट असतात. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातही अशाच प्रकारे झाली आहे आणि पहिल्या तारखेपासूनच थेट सामान्य माणूस, UPI वापरकर्ते आणि भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बरेच काही बदलले आहे. सणासुदीच्या काळात LPG दरात वाढ झाल्यानं ग्राहकांना झटका बसला आहे. तर इंडियन रेल्वेनं ट्रेन तिकीट ऑनलाईन बुकिंगशी संबंधित नियमही बदलला आहे, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांवर परिणाम होणार आहे.
एलपीजी सिलिंडर झाला महाग
१ ऑक्टोबरपासून होणाऱ्या बदलांमध्ये लोकांचे सर्वाधिक लक्ष एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होणाऱ्या बदलांवर असतं, कारण हे थेट स्वयंपाकघराच्या बजेटशी जोडलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती, पण ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी त्यात वाढ करण्यात आली आहे आणि तो दिल्ली ते मुंबईपर्यंत महाग झाला आहे. देशात एलपीजी सिलिंडरच्या किमती १६ रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. IOCL च्या वेबसाइटनुसार, दिल्लीत एका सिलिंडरच्या किमतीत १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि तो १५८० रुपयांऐवजी १५९५ रुपयांना मिळेल. तर कोलकात्यात किंमत १६८४ रुपयांवरून १७०० रुपये झाली आहे. मुंबईत आतापर्यंत १५३१ रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलिंडर आता १५४७ रुपयांना, तर चेन्नईमध्ये तो १७३८ रुपयांवरून १७५४ रुपये करण्यात आला आहे. मात्र, या वेळीही १४ किलोग्रामच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बदललेली नाही.
हवाई प्रवास होऊ शकतो महाग
ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसाचा दुसरा बदल हवाई प्रवाशांशी जोडलेला आहे, कारण सप्टेंबर महिन्यात विमान इंधनात (ATF) झालेल्या कपातीनंतर आता सणासुदीच्या काळात कंपन्यांनी ATF च्या किमतीत मोठी वाढ केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासूनचे नवीन दर पाहिल्यास, दिल्लीत त्याची किंमत ९०,७१३.५२ रुपये प्रति किलोलीटरवरून वाढून ९३,७६६.०२ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. कोलकात्यात ती ९३,८८६.१८ रुपयांऐवजी आता ९६,८१६.५८ रुपये, मुंबईत ८४,८३२.८३ रुपयांऐवजी नवी किंमत ८७,७१४.३९ रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये ती ९४,१५१.९६ रुपये प्रति किलोलीटरवरून वाढून आता ९७,३०२.१४ रुपये झाली आहे. एअर टर्बाइन फ्युएलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एअरलाइन्सच्या परिचालन खर्चात वाढ होईल, ज्यामुळे त्या फ्लाइट तिकीट दरात वाढ करू शकतात.
केवळ अशा प्रवाशांना ऑनलाईन तिकीट
तिसरा बदल रेल्वे प्रवाशांसाठी लागू होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहार थांबवण्यासाठी रेल्वेनं १ ऑक्टोबर २०२५ पासून नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती, जो आजपासून लागू होऊ शकतो. या अंतर्गत, आरक्षण (Reservation) उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत केवळ आधार (Aadhaar) पडताळणी झालेल्या व्यक्तीच ऑनलाईन तिकीट बुक करू शकतील. IRCTC वेबसाइट किंवा ॲप या दोन्हीवर हा नियम लागू होईल. सध्या, हा नियम तत्काळ बुकिंगवर लागू आहे. तर, कम्प्युटराईज्ड PRS काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
UPI शी संबंधित हा नियम बदलला
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) युजर्ससाठीही ऑक्टोबरची सुरुवात मोठ्या बदलासह होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) २९ जुलैच्या एका परिपत्रकात ही माहिती दिली होती की, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या UPI फीचर्सपैकी पीअर टू पीअर (P2P) कलेक्ट ट्रान्झॅक्शन फीचर काढून टाकलं जाणार आहे आणि हे १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. युजर्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून हे फीचर UPI ॲप्समधून हटवलं जात आहे.
बँकांमध्ये बंपर सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्यात सणांची गर्दी आहे आणि अशा परिस्थितीत जर तुमचे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचं काम असेल, तर आधी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेली ऑक्टोबर बँक सुट्ट्यांची यादी (October Bank Holiday List) पाहूनच घराबाहेर पडा, कारण असे होऊ नये की तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तिथे टाळं दिसू शकेल. महिन्याची सुरुवात दुर्गा पूजेच्या सुट्टीनं होईल आणि त्यानंतर संपूर्ण महिन्यात महात्मा गांधी जयंती, दसरा, लक्ष्मी पूजा, महार्षी बाल्मिकी जयंती, करवा चौथ, दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि छठ पूजा यासह एकूण २१ सुट्ट्या आहेत. यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारची साप्ताहिक सुट्टी देखील समाविष्ट आहे. मात्र, या बँक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या असू शकतात.
आरबीआय नवीन चेक पेमेंट सुविधा आणणार
जलद पेमेंटच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकत, आरबीआय ४ ऑक्टोबरपासून कंटिन्युअस चेक क्लिअरिंग (Continuous Check Clearing) सुविधा सुरू करेल. अनेक अहवालांनुसार, ही सुविधा दोन टप्प्यांत लागू होईल. पहिल्या टप्प्यात ती ४ ऑक्टोबरपासून २ जानेवारी २०२६ पर्यंत लागू होईल. दुसरा टप्पा ३ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल.
ऑनलाईन गेमिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार
पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन गेमिंगशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. यामध्ये वयोमर्यादा आणि परवाना (Licensing) आवश्यकतांशी संबंधित नियमांचा समावेश आहे.
स्पीड पोस्ट पाठवण्यासाठी खर्च वाढणार
१ ऑक्टोबरपासून टपाल विभागाद्वारे स्पीड पोस्ट पाठवण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. याचं कारण असं आहे की विभाग या सेवेचे शुल्क वाढवणार आहे. याव्यतिरिक्त, स्पीड पोस्ट OTP आधारित वितरण प्रणालीशी देखील जोडली जाईल. याचा उद्देश स्पीड पोस्टची डिलिव्हरी प्राप्तकर्त्याच्या पडताळणीनंतरच करणं हा आहे.