भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, बळीराजा चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:03 PM2021-12-29T19:03:21+5:302021-12-29T19:18:42+5:30

विदर्भातील काही जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीचा तडाखा बसला आहे. यामुळे रब्बी पिकासह बागायती पिकांचे अतोनात नुकसान.

मंगळवारी झालेल्या गारपिटीची तालुका महसूल विभागामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वाधिक गारपिट पवनी तालुक्यात झाल्याची माहिती आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पाऊस येत असल्याने वातावरणात गारवा अधिकच वाढल्याने थंडीतही वाढ झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीचा तडाखा बसला असून रब्बी पिकांसह बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आजही पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. लाखांदूर तालुक्यात ११४.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गारपिटीसह पावसाने रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान, पिकांचे पोते पावसात सापडले.

भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहाडी शहर, उसर्रा, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री, वरठी परिसरातही गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा गहू पिकाला फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून शेतात, घरासमोर आणि घरावरील पत्र्यांवरही गारा दिसून येत आहे