मराठी वर्षातील शेवटची एकादशी: ८ राशींचे पापमोचन, अपार पुण्य लाभेल; ४ राजयोगांचा शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:07 IST2025-03-24T07:07:07+5:302025-03-24T07:07:07+5:30

Weekly Horoscope: आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या…

Weekly Horoscope: या सप्ताहात शनीपालट आहे. २९ मार्च २०२५ रोजी रात्री ९.४२ वाजता शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपेल. कुंभ राशीची अडीच वर्षे, तर मीन राशीची साडेसातीची पाच वर्षे राहतील, तर मेष राशीला साडेसाती सुरू होत आहे.

ग्रहस्थिती अशी- गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत असून, २९ रोजी तो मीन राशीत जाईल. तेथे त्याची युती रवी, बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून यांच्याशी होईल. यामुळे अनेक राजयोग, युती योग जुळून येत आहेत. चंद्राचे भ्रमण धनू, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील.

बुधवारी दुपारी ३.१६ पासून पंचक सुरू होत आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार पंचक राहील. तसेच मंगळवारी २५ मार्च रोजी या मराठी वर्षातील शेवटची एकादशी फाल्गुन पापमोचनी एकादशी आहे. गुरुवारी, २७ मार्च रोजी प्रदोष, शिवरात्रि आहे. शनिवार, २९ मार्च रोजी फाल्गुन शनि अमावास्या आहे. हा काळ कोणत्या राशीसाठी कसा असेल? जाणून घ्या...

मेष: आगामी काळ मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना काही चांगले परिणाम मिळतील. प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न ते करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. ते त्यांच्या कामात रमून जातील. त्यामुळे त्यांची कामगिरी उठून दिसेल. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होईल. व्यापारानिमित्त केलेले प्रवास व्यापाऱ्यांसाठी लाभदायी ठरतील. प्राप्ती सामान्य राहिल्याने व खर्चात वाढ झाल्याने त्रस्त होऊ शकता. अध्ययन व स्पर्धेची तयारी करण्यासाठी दिवस खूपच अनुकूल आहेत. प्रकृतीच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल आहे.

वृषभ: प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असू शकते. तेव्हा त्यांनी थोडे सावध राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. काम मन लावून करतील. त्यांचे पूर्ण लक्ष कामावरच केंद्रित झाल्याने त्यांची कामगिरी उत्तम होईल. त्यांचे वरिष्ठ त्यांच्या कामगिरीवर खुश होतील. व्यापाऱ्यांची उन्नती होईल. कौटुंबिक जीवनात समन्वय साधण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. एखाद्या गोष्टीची व्यथा ते व्यक्त करू शकतील. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व गरज भासल्यास त्यांना मदत करावी. घरात एखादे मंगल कार्य संपन्न होऊ शकते. एखादा उत्सव साजरा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळू शकते.

मिथुन: विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतील. त्यांच्या प्रेमात व आकर्षणात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळेल. व्यापारी त्यांच्या कामाचा आनंद घेऊ शकतील. कामानिमित्त एखादे मोठे आयोजन होऊ शकते. त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न कराल. उत्तम प्राप्ती झाल्याने आर्थिक बाजू भक्कम होईल. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. कामाचा अतिरिक्त भार पडल्याने थकवा जाणवू शकतो. एखादी मानसिक चिंता सतावू शकते, जी कालांतराने दूर होईल.

कर्क: विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करतील. कामात ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. दूरदर्शीपणा यशस्वी करेल. कुटुंबाचा विचार कराल. कुटुंबियांसंबंधी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. कुटुंबियांच्या सहवासात राहाल. विद्यार्थ्यांसाठी उन्नतीदायक आहे. कुटुंबीय किंवा मित्रांसह एखादी धार्मिक यात्रा करू शकता.

सिंह: विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लहान-सहान तणाव असल्याचे दिसू शकते. तेव्हा त्याकडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ खूपच चांगला आहे. कायदेशीर लढ्यात व्यापारी यशस्वी होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. कुटुंबीयांप्रती सहानुभूती दर्शवू शकाल. व्यावसायिक कामात यश प्राप्त होईल. काम व कुटुंब ह्यादरम्यान समन्वय साधण्यात यशस्वी व्हाल. कामानिमित्त दूरवरचे प्रवास व काही खर्च करावा लागू शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. ते त्यांच्या अध्ययनात प्रगती करू शकतील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे नुकसानदायी ठरू शकते. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी.

कन्या: वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. त्याचे चांगले परिणाम पाहावयास मिळतील. वैवाहिक जोडीदार खुश होईल व सर्वतोपरी खुश करण्याचा प्रयत्न करेल. अखेरच्या दिवसात मन धार्मिक कार्यात रमेल. तसेच सासुरवाडीकडील लोकांशी संपर्क साधू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात पारंगत होतील. कामात प्रगती साधण्यात त्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. विरोधक आपणास त्रास देऊ शकतात. तेव्हा थोडे सावध राहावे. व्यापाऱ्यांना फायदा होईल. त्यांच्या कामात मजबुती दिसून येईल. त्यामुळे ते नवीन जोखीम घेऊन एखादे मोठे काम करण्याची इच्छा व्यक्त करतील. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल. ती वाढवण्यावर त्यांचा भर असेल.

तूळ: विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीत एखादे मंगल कार्य किंवा एखादे घर किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे आयोजन होऊ शकते. अचानकपणे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. ह्या पदोन्नतीमुळे सभोवतालची लोक अचंबित होतील. खर्चात हळूहळू वाढ होईल, मात्र ती योग्य कारणांसाठी असल्याने काळजी करू नये. प्राप्तीत वाढ होईल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची बोलणी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक: विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. काम व व्यक्तिगत जीवन ह्यात समतोल साधू शकाल. जीवनाच्या समन्वयात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांना हा काळ बरेच काही देणारा आहे. त्यांना नवीन काही शिकावयास मिळेल. त्यांच्या कौशल्यात वाढ होईल. व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. दृढ निश्चयाने कामे करून ती त्वरित पूर्ण कराल. एखाद्या गोष्टीने व्यावसायिक भागीदाराशी वाद होऊ शकतो. तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. त्यांची बुद्धिमत्ता तीव्र असल्याने विषय समजण्यास सुलभ होईल.

धनु: विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. कामातील व्यस्ततेमुळे जोडीदारास कबूल केलेल्या गोष्टी विसरू शकता, जे अतिशय अयोग्य आहे. तेव्हा असे काही होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामामुळे मजबूत होतील. कामास पूजा समजून कामे केल्याने त्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना एखादे नवीन काम मिळू शकते. कौटुंबिक जीवन सुखद होईल. प्रॉपर्टीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ लागल्याने अत्यंत खुश व्हाल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. परंतु, त्यांना मानसिक चिंता सोडून वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

मकर: विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीस एखादा चांगला कार्यक्रम होण्याची संभावना आहे. कामात विशेष दक्ष राहून कामे करावी लागतील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले तरी नोकरी सुटण्याची शक्यता आहे. सावध राहावे. कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नये. नोकरी जरी सुटली तरी काळजी करू नये. लगेचच आपल्या हाती दुसरी नोकरी असेल. व्यापारात दृढ राहिल्यास चांगले परिणाम मिळताना दिसू शकतील. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांसह फिरावयास किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊ शकता.

कुंभ: प्रेम जीवनातील नात्यात नावीन्य आल्याने दुसरे जीवन जगत असल्याची भावना निर्माण होईल. चेहेऱ्यावर आनंद उमटेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचे कारण राहणार नाही. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. जुन्या समस्या दूर होतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी कामाव्यतिरिक्त इतरत्र लक्ष घालू नये. इतरांच्या बाबतीत बोलत बसू नये. अन्यथा त्याचे नुकसान सोसावे लागू शकते. व्यापारी त्यांच्या कौशल्यामुळे व्यवसायात यशस्वी होतील. दूरवरच्या ठिकाणाशी केलेला व्यवसाय लाभदायी ठरेल. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. प्रॅक्टिस केल्याने त्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकेल.

मीन: वैवाहिक जीवन सुखद करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वैवाहिक जोडीदार कामात अत्यंत व्यस्त असेल. जर ते नोकरी करत असतील तर त्यांच्या कामात त्यांची व्यस्तता वाढेल. नोकरी करणाऱ्यांना कामात प्रगती करण्याची संधी मिळेल. कामगिरी इतरांच्या नजरेस भरेल. व्यक्तिगत प्रयत्नांमुळे चांगला आर्थिक लाभ होईल. भाग्य वृद्धी होईल. व्यापार वृद्धीसाठी दूरवरच्या क्षेत्रात किंवा राज्यात प्रवासास जाऊ शकता. त्याचा सकारात्मक लाभ होईल. असे असले तरी प्रवासापूर्वी सर्व तयारी करून ठेवावी. एखाद्याच्या सहकार्याने व्यवसायात वृद्धी होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड काही अडथळे येतील. त्यामुळे त्यांना एकाग्रता वाढवावी लागेल.