साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:17 IST2025-05-18T09:02:08+5:302025-05-18T09:17:47+5:30

Weekly Horoscope: १८ मे २०२५ ते २४ मे २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहाच्या अखेरीस दि. २३ रोजी बुध वृषभ राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- बुध मेष राशीत असून, शुक्रवारी तो वृषभ राशीत रवी व हर्षल यांच्याशी युती करील. गुरू मिथुन राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत आहे. शुक्र, शनि, राहु व नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. या सप्ताहात मंगळवारी सकाळी ७.३७ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवारी पूर्ण काळ पंचक असून, शनिवारी दुपारी १.४८ पर्यंत पंचक राहील. शुक्रवारी अपरा एकादशी तर शनिवारी प्रदोष आहे.

या आठवड्यातील ग्रहमान कोणत्या राशींना अतिशय अनुकूल ठरू शकेल? कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...

मेष: ह्या आठवड्यात प्रेमीजनांना चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात मात्र समस्या वाढतील, ज्यांचे निराकरण करण्यासाठी वडिलधाऱ्यांशी चर्चेचा प्रयत्न करावा लागेल. आर्थिक बाबतीत आठवडा समस्याग्रस्त आहे. तेव्हा कोणाकडून उसने पैसे घेऊ नका तसेच कर्जासाठी अर्ज करू नका. व्यापाऱ्यांसाठी आठवडा आनंददायी आहे. व्यापारवृद्धीसाठी त्यांची नवीन लोकांशी ओळख होईल. त्यामुळे त्यांच्या प्राप्तीचे काही नवीन स्रोत वाढतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना ज्ञान प्राप्तीची चांगली संधी मिळेल.

वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा कष्टदायी आहे. ह्या आठवड्यात नाते टिकवून ठेवण्यासाठी अहंकार बाजूस सारावा लागेल. विवाहितांना जोडीदारास समजून घ्यावे लागेल. असे न केल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या वाढतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. खर्चात वाढ झाल्याने त्रस्त व्हाल. कोर्ट - कचेरीशी संबंधित बाबी खर्चात वाढ करतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित फळ न मिळाल्याने ते त्रासून जातील. त्यामुळे ते एखाद्या चुकीच्या विषयाची निवड करण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात व्यस्ततेमुळे शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष होऊन त्या वाढतील.

मिथुन: हा आठवडा चांगला आहे. नाते संपुष्टात येऊ नये म्हणून प्रेमीजनांनी एकमेकांना समजून घ्यावे लागेल. ह्या आठवड्यात कौटुंबिक समस्यांच्या प्रभावामुळे विवाहितांचे जीवन तणावग्रस्त राहील. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. प्राप्तीत वाढ होईल. प्राप्तीत वाढ करण्यावर आपले लक्ष राहील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी समन्वय साधावा, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या काही जुन्या योजनांना गती येईल. ह्या आठवड्यात विद्यार्थी नवीन संशीधनात सहभागी होण्याचा प्रयत्न करतील. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी होतील. एखादी आर्थिक समस्या असली तर त्याकडे पूर्ण लक्ष द्यावे.

कर्क: हा आठवडा सुरुवातीस आनंद घेऊन येणारा आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा आनंददायी आहे. प्रेमीकेसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊन नाते अधिक दृढ कराल. विवाहितांना त्यांच्या जोडीदारास वेळ द्यावा लागेल. असे केल्याने अनेक दिवसांपासून चालत आलेले वाद संपुष्टात येतील. पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल, जी लाभदायी ठरेल. शेअर्स बाजाराशी संबंधीत व्यक्ती चांगला पैसा कमवू शकतील. इच्छापूर्ती सहजपणे करू शकाल. हा आठवडा कारकिर्दीसाठी चांगला आहे. मनात काही भ्रम असला तरी प्रगती कराल. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यासाठी मित्रांपासून दूर राहणे उत्तम. विषय बदलू शकता. आहाराकडे दुर्लक्ष करू नये.

सिंह: हा आठवडा विवाहितांसाठी आनंदाचा आहे. त्यांना जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत आठवडा मिश्र फलदायी आहे. एखाद्या व्यक्ती कडून उसने पैसे घेतले असल्यास त्याची परतफेड करण्यात समस्या निर्माण होईल. शेअर बाजाराशी संबंधीत व्यक्ती विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करतील. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. त्यांच्या व्यवसायाचा फैलाव परदेशात होईल. त्यामुळे त्यांच्या योजना फलद्रुप होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सध्या नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्यावा. सध्याची नोकरी चालू ठेवणे त्यांच्या हिताचे होईल. मात्र नवीन नोकरीसाठी अर्ज करू शकता. विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. दिनचर्येत योगासन व व्यायामास समाविष्ट करावे.

कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांच्या जीवनात प्रेमिकेमुळे काही तणाव निर्माण होईल. प्रेमिकेची अवस्था गोंधळाची असल्याने नात्यात काही कटुता येऊ शकते. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्या नात्यातील दुरावा आता संपुष्टात येईल. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने निष्कारण त्रस्त व्हाल. एखादी संपत्ती खरेदी करण्याची इच्छा ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांनी नवीन सौद्यांना विचारपूर्वक अंतिम स्वरूप द्यावे. नोकरी करणाऱ्यांनी दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज केला असल्यास त्यांना तेथून बोलावणे येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा पूर्वीपेक्षा चांगला आहे. त्यांना जीवनात शिस्त पाळावी लागेल. नवीन शिकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

तूळ: हा आठवडा चांगला आहे. जेथे हात लावाल तेथून पैसे काढू शकाल. कामाचे कौतुक होईल. प्रेमीजनांच्या आनंदात भर पडेल. वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे संततीकडे काहीसे दुर्लक्ष होईल व त्यामुळे ते त्रस्त होतील. नोकरी करणाऱ्यांना एखादे काम करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. त्यांची पदोन्नती संभवते. व्यावसायिकांच्या योजना त्यांना चांगला लाभ मिळवून देतील. मित्रांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. जर एखादा विषय बदलावयाचा असेल तर वरिष्ठांचा सल्ला जरूर घ्यावा.

वृश्चिक: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. कारकीर्दीस मात्र चांगला आहे. नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करू शकाल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकतील. तिच्या कार्यक्षेत्रात तिची प्रतिष्ठा वाढल्याने खुश व्हाल. वैवाहिक जीवनातील समस्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या मदतीने सहजपणे दूर होऊ शकतील. आर्थिक दृष्ट्या आठवडा मिश्र फलदायी आहे. जर कोणाकडून उसने पैसे घ्यावयाचे असतील तर ते सहजपणे आपल्याला मिळू शकतील. धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल.

धनु: हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. अभ्यासात सहभागी होऊन ते ज्ञानात भर घालतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जर एखादे भांडण झाले असेल तर त्यांनी जोडीदाराशी चर्चा करून ते मिटविण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून हे भांडण घराबाहेर जाऊ शकणार नाही. आर्थिक बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरू शकेल. नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाईल. प्राप्तीचे नवीन काही स्रोत मिळतील. व्यावसायिकांची एखादी खंडित झालेली व्यवस्था ह्या आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी समन्वय साधावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिनचर्येत योगासन व प्राणायाम ह्यांचा समावेश करावा.

मकर: हा आठवडा तणावग्रस्त राहील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक समस्या त्रास देतील. अशक्तपणा जाणवू शकेल. तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. विवाहितांच्या जीवनात आनंदाचे वातावरण राहील. मुले त्यांचे नांव प्रसिद्ध करतील. आर्थिक बाबीत हा आठवडा चांगला आहे. इच्छापूर्ती सहजपणे करू शकाल. व्यावसायिकांनी व्यवसायात कोणाशीही भागीदारी करू नये. कारण त्यांचा डोळा आपल्या पैश्यांवर राहील. नोकरी करणाऱ्यांनी कोणाचे ऐकून कामे करू नये. विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही, ह्या उलट इतर गोष्टीत त्यांचे मन रमेल.

कुंभ: हा आठवडा चांगला आहे. आरोग्यास हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आहारावर लक्ष ठेवावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतील ज्या चर्चा करून सहजपणे दूर होऊ शकतील. दोघेही एकमेकांना समजून घेतील. आर्थिक दृष्ट्या आठवडा मिश्र फलदायी राहील. ह्या आठवड्यात वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही योजनेत अतिरिक्त गुंतवणूक करू नये. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागण्याची संभावना आहे. व्यवसायात योजनांचे आयोजन करावे लागेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल, अन्यथा अभ्यासात समस्या येऊ शकतात. काही दिवसांसाठी मित्रांपासून दूर राहावे.

मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनात भांडणे होतील जी सामंजस्य दाखवल्यास मिटू शकतील. परंतु अहंकारामुळे समस्या वाढू शकतात. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या प्रेमिकेशी रोमँटिक होतील. ह्या आठवड्यात खर्च वाढतील. बचत कमी होईल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास जाल तेव्हा ती महागच मिळेल. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांचा व्यवसाय प्रगती करेल. त्यांचे एखादे काम दीर्घ काळापासून स्तंभित झाले असेल तर ते आता पुन्हा सुरू होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. शासकीय नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल.