साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्साहाचा काळ, गरजेला पैसा मिळेल; मोठे यश, शेअर बाजारात लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 10:42 IST2026-01-18T10:29:42+5:302026-01-18T10:42:27+5:30
Weekly Horoscope: १८ जानेवारी २०२६ ते २४ जानेवारी २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, केतु सिंह राशीत आहे. रवि, मंगळ, बुध, शुक्र आणि प्लूटो मकर राशीत आहे. राहु कुंभ राशीत, तर शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन या रार्शीमधून राहील. या सप्ताहात रविवारी दर्श अमावास्या, मंगळवारी धर्मनाथ बीज, गुरुवारी गणेश जयंती व विनायकी चतुर्थी, तर शुक्रवारी वसंत पंचमी आहे.

शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत पंचग्रही योग जुळून आलेला आहे. यामुळे अनेक शुभ योग, राजयोग जुळून आलेले आहेत. या कालावधीत कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सर्वसाधारण राहील. व्यावसायिक पातळीवर अपेक्षित निकाल मिळू शकतात. व्यापार वृद्धिंगत होईल, तर नोकरी करणाऱ्यांच्या कार्यक्षमतेत आणि कामगिरीत मोठी सुधारणा दिसून येईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा नशिबाची साथ देणारा ठरेल; एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, मित्रांसोबत पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी, अन्यथा वादाचे प्रसंग घडू शकतात. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, तरच भविष्यात उत्तम नोकरी आणि करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

वृषभ: हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. व्यवसायाच्या ठिकाणी वागणूक अत्यंत प्रभावी आणि मृदू राहील, ज्यामुळे ग्राहक आणि सहकारी आकर्षित होतील आणि व्यवसायात लाभ मिळेल. नोकरीत मोठे यश किंवा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखाद्या मोठ्या फायद्याचे योग आहेत. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत किंवा कोचिंग क्लासची मदत घ्यावी लागू शकते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल.

मिथुन: हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहाराचे नियोजन करा. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला असला तरी, कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही, त्यामुळे घाईघाईत निर्णय घेऊ नका. भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर या काळात पारदर्शकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा मतभेद होऊ शकतात. नोकरीत कामाचे कौतुक होईल आणि मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष विचलित होण्याच्या समस्या जाणवू शकतात; अनावश्यक चिंता आणि अडथळ्यांमुळे अभ्यासावर परिणाम होईल, त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

कर्क: हा आठवडा काहीसा नरम राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन संधी मिळतील, मात्र सरकारी योजनांमधून लाभ मिळवण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागेल. व्यापाऱ्यांना जुन्या अडचणींमधून सुटका मिळेल आणि व्यवसायात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असून, जे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मार्ग मोकळा होईल.

सिंह: या आठवड्यात अत्यंत सावधगिरीने पावले उचलणे आवश्यक आहे. बराच पैसा खर्च होऊ शकतो. वादापासून दूर राहिलेलेच बरे. सरकारी कामांतून उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीला काही खर्च करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळावे, अन्यथा प्रतिमा मलीन होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर असून नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळेल.

कन्या: हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार याकडे लक्ष द्यावे. भागीदारीत व्यापार करत असाल, तर सावध राहा; भागीदारासोबतचे व्यवहार स्पष्ट ठेवा. नोकरीत प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर द्यावा, ज्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. गरजेनुसार धन उपलब्धता असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करू शकतील अशा चांगल्या मित्रांची संगत धरण्याचा सल्ला आहे. लक्षात ठेवा, अभ्यासात प्रगती करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे.

तूळ: हा आठवडा उत्साहवर्धक असेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. स्वतःसाठी एखादी मौल्यवान वस्तू किंवा वस्त्रांची खरेदी करू शकता. व्यवसायात काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीमुळे प्रगती वेगाने होईल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयात शत्रूंपासून सावध राहावे, कारण विरोधक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शैक्षणिक प्रगतीचा असून अभ्यासात एकाग्रता उत्तम राहील, ज्यामुळे कठीण विषय समजणे सोपे जाईल.

वृश्चिक: हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कोणतीही मोठी चिंता सतावणार नाही, तरीही बचतीकडे लक्ष देणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कार्यकुशलतेमुळे कार्यालयात विशेष नाव कमावतील आणि कौतुकास पात्र ठरतील. व्यवसायात काही नवीन प्रोजेक्ट्स सुरू करताना सावधानता बाळगा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही, पण हळूहळू एकाग्रता वाढेल आणि परीक्षेत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रिय व्यक्तीसोबत लांबच्या प्रवासाचे योग आहेत.

धनु: हा आठवडा ठीकठाक राहील. उत्साहाने कामे पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत आठवड्याची सुरुवात काहीशी ओढाताणीची असू शकते. फालतू खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक चणचण भासू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा असून कामात काही अनपेक्षित अडथळे येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगली बातमी म्हणजे, कार्यालयात पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शिक्षणाशी संबंधित एखादा छोटा प्रवास किंवा सहल घडण्याची शक्यता आहे, जी ज्ञानात भर घालणारी ठरेल.

मकर: हा आठवडा बदलांचा आणि चढ-उतारांचा असेल. कुटुंबासोबत काही मनोरंजक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वैवाहिक आयुष्यात लहान-लहान गोष्टींवरून जोडीदाराशी वाद घालणे टाळा, सामंजस्याने प्रश्न सोडवा. आर्थिक नियोजन करताना धनसंचयाकडे विशेष लक्ष द्या; सध्या कर्ज घेण्याचे टाळलेले बरे. व्यावसायिकांनी व्यवसायातील सरकारी किंवा कायदेशीर गुंतागुंत टाळण्याचा प्रयत्न करावा. जे सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना या आठवड्यात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास त्यांना यशाची दारे खुली होतील.

कुंभ: हा आठवडा सामान्य पण उत्साही असेल. आर्थिक आघाडीवर खूप मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवू नका. पण दैनंदिन गरजा पूर्ण होण्याइतपत पैसा खेळता राहील. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खरी प्रतिभा सिद्ध करावी लागेल. शेअर मार्केटशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना या आठवड्यात चांगला फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशी किंवा बाहेरगावी जाण्याची इच्छा असणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल.

मीन: हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरेल. अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो, जो टाळणे कठीण असेल, त्यामुळे आर्थिक तरतूद ठेवा. व्यवसायातील स्थिती सुधारण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच प्रगती होईल. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता असल्याने शांत राहणे हिताचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडी कमतरता जाणवू शकते, ती भरून काढण्यासाठी वेळेचे नियोजन करा आणि कमकुवत विषयांवर अधिक काम करा.

















